स्पेनमध्ये एक अत्यंत भीषण रेल्वे दुर्घटना घडली. दक्षिण स्पेनमधील कॉर्डोबा प्रांतात दोन हाय-स्पीड गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसल्याने २१ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात ७० पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण स्पेनमध्ये खळबळ उडाली असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना आदमूज गावाजवळ घडली. 'मलागा' येथून 'माद्रिद'ला जाणारी एक हाय-स्पीड ट्रेन अचानक रूळावरून घसरली. ट्रेन रूळावरून बाजूला जात असतानाच, विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या वेगवान ट्रेनची तिला भीषण धडक बसली.
दुसरी ट्रेन माद्रिदहून हुएल्वाकडे चालली होती. या दोन्ही रेल्वे गाड्यांमध्ये मिळून सुमारे ५०० प्रवासी प्रवास करत होते. धडक इतकी भीषण होती की रेल्वेचे अनेक डबे एकमेकांत अडकले आणि काही डब्यांचे अक्षरशः तुकडे झाले.
स्पॅनिश रेल्वे ऑपरेटर 'एडीआयएफ' आणि सिव्हिल गार्डच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी अजूनही डब्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. आपत्कालीन सेवा, रेड क्रॉस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
कॉर्डोबा आणि जैन शहरांतून मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. जखमींना तातडीने जवळच्या सहा वेगवेगळ्या रुग्णालयांत हलवण्यात आले असून माद्रिदच्या रुग्णालयांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
या भीषण अपघातानंतर माद्रिद आणि अंदालुसिया दरम्यान धावणाऱ्या सर्व हाय-स्पीड रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मार्गावरील इतर सर्व गाड्यांना त्यांच्या सुरुवातीच्या स्थानकावर परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रेड क्रॉसकडून प्रवाशांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्न पुरवण्यात येत आहे. स्पेनच्या परिवहन मंत्रालयाने या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, ट्रेन रूळावरून नेमकी कशी घसरली, याचा शोध घेतला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.