कॅनबेरा: युक्रेनमधील युद्ध लांबल्याने आणि यश मिळत नसल्याने रशियाच्या सैन्याचे मनोबल खचले असून वरीष्ठांचे आदेश ते सरळ धुडकावून देत आहेत, असा दावा ब्रिटनच्या गुप्तचर विभागाने केला आहे. रशियन सैनिक आपली शस्त्रे फेकून देत असून, एकदा त्यांनी चुकून आपलेच विमान खाली पाडले, असाही दावा करण्यात आला आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचा युक्रेनमध्ये युद्ध सुरू करण्याबाबतचा अंदाज साफ चुकला आहे, असे मत ब्रिटनच्या इलेक्ट्रॉनिक गुप्तचर विभागाचे प्रमुख जेरेमी फ्लेमिंग यांनी येथील एका कार्यक्रमादरम्यान नोंदविले. ‘युक्रेनचे नागरिकही इतका प्रतिकार करतील, असे पुतीन
यांना वाटलेच नव्हते. जगाने त्यांच्यावर लादलेल्या निर्बंधांचा होणाऱ्या परिणामाचाही पुतीन यांना अंदाज आला नाही. लष्करी सामर्थ्य आणि विजयाबाबत त्यांचे सर्व अंदाज चुकले,’ असे फ्लेमिंग यांनी सांगितले.
रशियाच्या सैनिकांना वेळेवर अन्न आणि शस्त्रांची रसद मिळत नसून त्यांचे मनोबलही खचत असल्याचे आमच्या गुप्तहेरांनी पाहिले आहे, अशी माहिती फ्लेमिंग यांनी सांगितली. ‘खचलेले रशियन सैनिक वरीष्ठांचे आदेश पाळण्यासही नकार देत आहेत. आपल्या शस्त्रांची आणि उपकरणांची ते तोडफोड करत आहेत. त्यांनी एकदा चुकून आपल्याच हवाई दलाचे लढाऊ विमान पाडले,’ असे त्यांनी सांगितले. पुतीन यांचे सल्लागार त्यांना खरी माहिती सांगण्यास घाबरत असले तरी रशियन सरकारला परिस्थितीची स्पष्ट जाणीव निश्चितच झालेली असणार, असा दावाही फ्लेमिंग यांनी केला.
सायबर हल्ल्यांचा इशारा
जमिनीवर सैन्याला फारसे यश मिळत नसल्याने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले होण्याचा इशारा जेरेमी फ्लेमिंग यांनी दिला. लष्करी मोहिमेलाही वेग आणण्यासाठी मित्र देशांच्या सैन्याची मदत घेण्याबाबत अध्यक्ष व्लादीमित पुतीन विचार करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
युक्रेन युद्धातील घडामोडी
युक्रेनमधील अणुभट्ट्यांना तांत्रिक साह्य करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेच्या प्रमुखांचा युक्रेन दौरा
शांतता करारासाठी युक्रेन आणि रशियादरम्यान शुक्रवारी (ता. 1) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा
युक्रेन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी तुर्कस्तान प्रयत्नशील
ऑस्ट्रेलियाने युक्रेनला अधिक शस्त्र पुरवठा करावा आणि रशियावर अधिक निर्बंध लादावेत: व्होलोदीमिर झेलेन्स्की
युक्रेन युद्ध ही रशियाचे धोरणात्मक घोडचूक: अमेरिका
रशियाविरोधात पाठिंबा न दिल्याने जॉर्जिया आणि मोरोक्कोमधील युक्रेनचे राजदूत मायदेशी
विमानांसाठी 3.5 अब्ज डॉलरचा दावा
डब्लिन: विविध देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे रशियामध्ये अडकून पडलेल्या विमानांसाठी विमान भाडेतत्त्वावर देणाऱ्या एका कंपनीने 3.5 अब्ज डॉलरचा विमा दावा दाखल केला आहे. ‘एअरकॅप’ या कंपनीने रशियातील विमान कंपन्यांना 135 विमाने भाडेतत्त्वावर दिली असून निर्बंधांनंतर त्यापैकी केवळ 22 विमाने त्यांना परत मिळाली आहेत. उर्वरित विमाने परत मिळण्याची आशा अत्यंत कमी आहे. रशियाबरोबरील करार रद्द केल्यानंतरही त्या विमानांचा रशियामध्ये वापर होत असल्याने नुकसान भरपाई म्हणून 3.5 अब्ज डॉलर मिळावेत, असा दावा या कंपनीने केला आहे.
चेर्निहिव्हमध्ये हल्ले सुरुच
लंडन: युक्रेनची राजधानी किव्ह आणि चेर्निहिव्ह या शहरांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी केले असल्याचा दावा रशियाने केला असला तरी चेर्निहिव्हवर जोरदार हल्ले सुरुच असल्याचा दावा ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. या शहरावर रणगाड्यांमधून तोफगोळ्यांच्या माऱ्याबरोबरच क्षेपणास्त्र हल्लेही सुरु आहेत, असे ब्रिटनने सांगितले. येत्या काही दिवसांत रशिया आणि युक्रेनच्या सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
युक्रेनला आणखी 50 कोटी डॉलरची मदत
वॉशिंग्टन: रशियाचे हल्ले सुरुच असल्याने युक्रेनला आणखी 50 कोटी डॉलरची थेट मदत देण्याचा निर्णय अमेरिका सरकारने घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर यांच्यात काल (ता. 30) सुमारे तासभर दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी, आर्थिक मदत करणार असल्याचे बायडेन यांनी झेलेन्स्की यांना सांगितले. अमेरिकेने युक्रेनला पुरविलेल्या युद्ध साहित्याचा आणि त्याच्या उपयोगाबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला. झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा अमेरिकेकडे लढाऊ विमानांची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.