Sudan Drone Attack: सुदानमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धाच्या क्रूरतेची आणखी एक घटना समोर आली आहे. उत्तर दारफुर प्रांताची राजधानी असलेल्या अल-फाशर शहरातील एका मशिदीवर शुक्रवारी (19 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास ड्रोन हल्ला करण्यात आला. या अमानवीय हल्ल्यात 75 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या स्फोटाने संपूर्ण मशीद परिसरात हाहाकार आणि किंकाळ्यांचा आवाज पसरला.
स्थानिक वैद्यकीय गट आणि सूडान डॉक्टर्स नेटवर्कने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला अर्धसैनिक दल रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) ने केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. मरण पावलेल्यांमध्ये नमाज अदा करणाऱ्या लहान मुलांचा आणि वृद्धांचा समावेश आहे. नमाज पठण सुरु असतानाच ड्रोन हल्ला करण्यात आल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले.
सुदान डॉक्टर्स नेटवर्कने या हल्ल्याला "निष्पाप नागरिकांविरुद्धचे एक घृणास्पद कृत्य" असे म्हटले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, "हा हल्ला RSF च्या मानवाधिकार आणि धार्मिक मूल्यांप्रती असलेल्या घोर उपेक्षेचे दर्शन घडवतो. या घटनेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे."
दरम्यान, हा हल्ला इतका भयानक होता की स्फोटामुळे मृतांचे अवयव काही फूट हवेत उडून इकडे-तिकडे पडले. मानवाधिकार कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या 'अल-फाशर रेझिस्टन्स कमिटी'ने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात मशिदीचा एक भाग पूर्णपणे मलब्यात बदललेला दिसत असून अनेक मृतदेह विखुरलेले आहेत.
सुदानमध्ये लष्कर आणि अर्धसैनिक दल RSF यांच्यात एप्रिल 2023 पासून संघर्ष सुरु आहे, जो आता एका भीषण गृहयुद्धाचे रुप धारण करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, या युद्धात आतापर्यंत 40,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, 1.2 कोटींहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. लाखो लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत.
दारफुर भागात सुदानी सैन्याचा अल-फाशर हा शेवटचा प्रमुख गड मानला जातो. याच कारणामुळे गेल्या एक वर्षापासून हा भाग संघर्षाचे केंद्र बनला आहे. गेल्या आठवड्यातही येथे अनेक हल्ले झाले आहेत. गुरुवारीही जोरदार स्फोटांचे आवाज ऐकून नागरिक घाबरले होते. रेजिस्टेंस कमिटीच्या मते, RSF ने या संघर्षात अनेकदा महिला, वृद्ध आणि विस्थापित छावण्यांमध्ये राहणाऱ्या निःशस्त्र नागरिकांना लक्ष्य केले आहे.
अशा प्रकारे धार्मिक स्थळांवर हल्ला करुन निष्पाप नागरिकांना ठार मारणे हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे स्पष्ट उल्लंघन आहे. या घटनेने मानवाधिकारांच्या उल्लंघनाची आणि युद्धातील क्रूरतेची आणखी एक वेदनादायक आठवण करुन दिली आहे. जोपर्यंत या गृहयुद्धावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत अशाच आणखी अनेक घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.