
Sudan Darfur Airstrike: सुदानमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धाने आता एक गंभीर वळण घेतले आहे. सुदानच्या लष्कराने दारफुर प्रांतातील एका विमानतळावर मोठा हवाई हल्ला केला. हे विमानतळ कुख्यात निमलष्करी गट रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) च्या नियंत्रणाखाली होते. या हल्ल्यात संयुक्त अरब अमिराती (UAE) चे एक संशयास्पद लष्करी विमान नष्ट करण्यात आले असून, 40 सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सुदानी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑगस्ट रोजी दारफुर प्रांताची राजधानी असलेल्या न्याला (Nyala) येथील विमानतळावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांमध्ये कोलंबियाच्या (Colombia) नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये यूएईने आरएसएफसाठी पाठवलेली शस्त्रे आणि उपकरणांची मोठी खेपही नष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदानी लष्कराने केलेल्या या कारवाईला परदेशी हस्तक्षेपाविरुद्धचा एक कडक संदेश मानले जात आहे.
सुदानमधील (Sudan) संघर्ष एप्रिल 2023 पासून सुरु आहे. राजधानी खार्तूमसह अनेक भागांमध्ये सुदानी लष्कर आणि आरएसएफ यांच्यात सुरु असलेल्या भीषण संघर्षाने आता पूर्ण गृहयुद्धाचे स्वरुप धारण केले आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला असून, 1.4 कोटींहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. यामुळे देशाचा मोठा भाग दुष्काळ आणि उपासमारीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय (ICC) या युद्धात झालेल्या नरसंहार, बलात्कार आणि इतर युद्ध गुन्ह्यांची चौकशी करत आहे.
सुदान टीव्हीच्या वृत्तानुसार, ज्या विमानाला सुदानी लष्कराने लक्ष्य केले, ते अरब आखाती प्रदेशातील एका लष्करी तळावरुन उडून न्याला विमानतळावर उतरले होते. मात्र, सुदानी लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यात ते उद्ध्वस्त झाले. या घटनेनंतर कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो (Gustavo Petro) यांनी एक्स (X) वर ट्विट करुन, कोलंबियन सैनिकांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.
यापूर्वी, संयुक्त राष्ट्रांच्या (UN) एप्रिलमधील एका अहवालात दारफुरमध्ये कोलंबियन भाडोत्री सैनिकांची उपस्थिती असल्याचा उल्लेख होता. या सैनिकांना आरएसएफसाठी एका खासगी सुरक्षा कंपनीने नियुक्त केले होते. दुसरीकडे, सुदानी विमान वाहतूक संस्थेने आरोप केला की, या हल्ल्यानंतर यूएईने सुदानी विमानांना त्यांच्या विमानतळांवर उतरण्यापासून रोखले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.