Pak Wants Fuel From Russia: पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेला नाराज करणारे वक्तव्य केले आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे नवे अर्थ मंत्री इशार दार यांनी रशियाकडूनही इंधन खरेदीची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे रशियाने भारताला ज्या किंमतीत तेल दिले आहे, त्याच किंमतीत पाकिस्तानलाही तेल पुरवावे, अशी मागणीही दार यांनी केली आहे.
फेब्रुवारीत रशिया-युक्रेन युद्धास सुरवात झाल्यानंतर जगभरातील देशांनी रशियावर विविध निर्बंध लावले. रशियाच्या वस्तू खरेदीवरही निर्बंध आले. तथापि, भारताने अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून कमी किंमतीत कच्च्या तेलाची खरेदी केली. अमेरिकेने त्यावर आक्षेप घेतला होता. पण, भारताने अमेरिकेचा विरोध जुमानला नव्हता.
पाकिस्तानात इशाक दार यांनी ऑक्टोबरच्या सुरवातीलाच अर्थ मंत्री पदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांच्यापुर्वी मिफ्ताह इस्माईल अर्थमंत्री होते. त्यांच्याकाळात पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची अवस्था वाईट झाली होती. सध्या पाकिस्तानकडे केवळ 8 अब्ज डॉलर फॉरेन रिझर्व्ह आहे. आता लवकरच हिवाळा सुरु होणार असून या काळात इंधनाचा वापर जवळपास दुप्पट होतो.
पाकिस्तानही स्वस्तःत तेल खरेदी करू इच्छितो का, असा सवाल अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दार यांना केला होता. त्यावर दार म्हणाले की, भारताने जेव्हा रशियाकडून ऑईल खरेदी केली तेव्हा पाश्चिमात्य देशांनी विरोध केला नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या संकटात आहे. जर रशियाने भारताला दिलेल्या दरातच आम्हाला तेल दिले तर चांगले ठरेल. पाश्चिमात्य देशांना यावर अडचण नसेल, अशी आशा आहे.
गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पाकिस्तानला जगातील सर्वात धोकादायक देश असे संबोधले होते. त्याविषय़ी काही बोलणे दार यांनी टाळले. याबाबत पंतप्रधान शाहबाज शरिफ बोलले आहेत, मला काही बोलायचे नाही.
मी येथे आर्थिक बैठकांसाठी आलो आहे. एफएटीएफच्या ग्रे यादीतून बाहेर येण्यासाठी आम्ही अनेक अवघड उपाय केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. २० ऑक्टोबर रोजी पॅरिसमध्ये एफएटीएफची बैठक होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.