Karachi Bomb Attack: दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानात काही दिवसांपूर्वी चीन नागरिकांवर हल्ला झाला होता. सातत्याने होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे पाकिस्तानात कोण सुरक्षित आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. शुक्रवारी सकाळी कराचीच्या लांधी भागात आत्मघातकी हल्ला झाला. जपानी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला लक्ष्य करुन हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर कारमधून प्रवास करणारे पाचही जपानी नागरिक सुरक्षित आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत आत्मघाती हल्लेखोर आणि दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
पोलिस प्रवक्ते अबरार हुसेन बलोच यांनी सांगितले की, जपानी नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. सध्या त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. सध्या कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. असे भयंकर दहशतवादी हल्ले पाकिस्तानात सातत्याने घडत आहेत, ज्यात तालिबान आणि अल कायदा सारख्या संघटनांचा हात आहे. याशिवाय, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी दहशतवादी संघटनेकडूनही पाकिस्तानात हल्ले करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत चिनी नागरिकांना लक्ष्य करणारे अनेक हल्ले झाले आहेत, मात्र जपानी नागरिकांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दुसरीकडे, कराची पोलिसांनी हा आत्मघाती हल्ला असल्याची पुष्टी केली आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात आणखी एका वाहनाचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्याच्या अंगावर आत्मघाती जॅकेट होते. ज्या जपानी नागरिकांना लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला ते एका एक्सपोर्ट युनिटमध्ये काम करत होते. जिना रुग्णालयाने सांगितले की, तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन जण गंभीर जखमी आहेत. दोन सुरक्षा कर्मचारी नूर मोहम्मद, लंगर खान आणि एक नागरिक सलमान रफिक अशी जखमींची नावे आहेत. या घटनेत एकही जपानी नागरिक जखमी झाला नाही.
जिओ न्यूजने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, स्फोटानंतर एक दहशतवादी वाहनाला लक्ष्य करत गोळीबार करत होता. सिंधचे राज्यपाल कामरान टेसोरी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून तपासासाठी आयजींना घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. ते म्हणाले की, कराचीसारख्या शहरात दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.