Pakistan Court: पाकिस्तान सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. यातच, काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीने पाकिस्तानात न्यायव्यवस्थेची काय स्थिती आहे याबद्दल अवघ्या जगाला कळाले होते. चक्क न्यायाधीशांना पाकिस्तानी गुप्तचर संस्थे (ISI) कडून धमक्या देण्यात येत असल्याची बातमी आली होती. इस्लामाबाद उच्च न्यायायालयातील 6 न्यायाधीशांचे एक पत्रही व्हायरल झाले होते. यातच आता, पाकिस्तानी न्यायालयाशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील एका न्यायालयाने सिंध प्रांतातील एका व्यक्तीला आपल्या मुलीला नाकारल्याबद्दल आणि पहिल्या पत्नीवर व्यभिचाराचा खोटा आरोप केल्याबद्दल 80 फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे. अशा प्रकारची शिक्षा पाकिस्तानात सहसा दिली जात नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानातील ही बातमी सध्या चर्चेत आहे.
दरम्यान, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश (मालीर) शहनाज बोह्यो यांनी फरीद कादिरला आपल्या मुलीचे पितृत्व नाकारण्याच्या आणि पहिल्या पत्नीवर खोटे आरोप करण्याच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले, असे डॉन वृत्तपत्राने सोमवारी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. 'कजफसाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला 80 फटके मारण्याची शिक्षा होईल', असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दोषी ठरल्यानंतर, आरोपीने न्यायालयात सादर केलेले कोणतेही पुरावे ग्राह्य धरले जाणार नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी फरीद कादिरच्या पहिल्या पत्नीने न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तिने आपल्या तक्रारीत सांगितले होते की, तिने फेब्रुवारी 2015 मध्ये फरीद कादिरशी लग्न केले होते. डिसेंबर 2015 मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. दुसरीकडे, आरोपी फरीदने त्याच्या पहिल्या पत्नीने केलेल्या आरोपांचे खंडन केले. त्याने सांगितले की, त्याने आपल्या पहिल्या पत्नीसोबत फक्त सहा तास घालवले होते, त्यानंतर ती घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही.
“हे पूर्णपणे स्पष्ट आहे की, आरोपी खोटारडा आहे. त्याने आपल्या पहिल्या पत्नीवर मुलीच्या पितृत्वाबाबत व्यभिचाराचा आरोप केला,” असे न्यायालयाने आदेशात म्हटले. कझाफ (व्याभिचार) अध्यादेश, 1979 च्या कलम 7(1) अंतर्गत आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला 80 फटके मारण्याची शिक्षा दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.