Pakistan Politics: पाकिस्तानातील राजकीय संकट अधिक गडद होत चालले आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होणार असे बोलले जात आहे.
यातच आता, पाकिस्तानच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गुरुवारी सांगितले की, 'जर इम्रान खान शरण आले तर आम्ही इस्लामाबाद पोलिसांना माजी पंतप्रधानांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यापासून रोखू.'
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या (EC) प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी ही माहिती दिली.
या प्रकरणी पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरुद्ध तोशाखाना भेटवस्तूंचा तपशील लपवल्याबद्दल फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
न्यायाधीश इक्बाल यांनी 28 फेब्रुवारी रोजी 70 वर्षीय खान यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.
विशेष म्हणजे, इस्लामाबाद पोलिसांना (Police) त्यांना 18 मार्च रोजी न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले होते.
या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती म्हणाले की, 'न्यायालयाकडून कोणताही दिलासा मागण्यापूर्वी खान यांनी बिनशर्त आत्मसमर्पण करावे.'
दुसरीकडे, इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खान यांच्या वकिलाने प्रतिज्ञापत्र सादर केले की, 'त्यांचा क्लायंट 18 मार्च रोजी न्यायालयात हजर होईल.'
त्यावर, माजी पंतप्रधान उपस्थित नसतील तर या शपथपत्राचा काय अर्थ आहे, असे न्यायाधीश म्हणाले.
ते म्हणाले की, “इम्रान खान यांनी न्यायालयात यावे अशी आमची इच्छा आहे. ते का येत नाहीत? कारण काय आहे? इम्रान खान यांना कायद्यानुसार सहकार्य करावे लागेल.''
इम्रान खान यांचे वकील ख्वाजा हॅरिस यांनी स्पष्ट केले की, 18 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत त्यांना प्रतिज्ञापत्र द्यायचे आहे.
यावर न्यायमूर्ती म्हणाले की, 'जर खान यांनी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले तर आम्ही इस्लामाबाद पोलिसांना त्यांना अटक करण्यापासून रोखू.'
कायदेशीरदृष्ट्या इम्रान यांना थेट न्यायालयात हजर करायला हवे होते, असेही न्यायालयाने म्हटले. न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, 'जर खान न्यायालयात हजर झाले असते तर पोलिसांना त्यांच्या निवासस्थानाबाहेर बसण्याची गरजच पडली नसती.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.