Canada PM Justine Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्यानंतर भारताचा सूर बदलला, असे त्यांनी म्हटले. ट्रूडो म्हणाले की, ''पन्नूच्या हत्येच्या कथित कटात भारतीय नागरिकाचा सहभाग असल्याबद्दल अमेरिकेने भारताला चेतावणी दिली तेव्हापासूनच भारताचे सूर बदलले.'' ते पुढे म्हणाले की, ''भारताला कदाचित हे लक्षात आले असेल की तो नेहमीच आक्रमक भूमिका घेऊ शकत नाही. भारताला आता कळले असेल की कॅनडाविरुद्ध आघाडी उघडून प्रश्न सुटणार नाहीत.''
दरम्यान, कॅनडाला सध्या या मुद्द्यावर भारताशी वाद घालण्याची इच्छा नाही, असेही ट्रूडो यांनी स्पष्ट केले. कॅनडाला फक्त आपल्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करायची असल्याचे त्यांनी नमूद केले. ट्रुडो पुढे म्हणाले की, ''आम्हाला भारतासोबत व्यापार करारावर काम करायचे आहे. आम्हाला इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी पुढे जाताना पहायची आहे. परंतु कॅनेडियन लोकांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल याची खात्री करणेही आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही कायद्याच्या कक्षेतच काम करत आहोत.''
गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट भारताने रचल्याचा आरोप अमेरिकेने गेल्या महिन्यात केला होता. पन्नू हा अमेरिकन नागरिक आहे. तर भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले आहे. पन्नूवर भारतात दोन डझन गुन्हे दाखल आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणी न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात खटलाही दाखल केला आहे. यामध्ये निखिल गुप्ता नावाचा भारतीय नागरिक आणि एका अज्ञात भारतीय सरकारी अधिकाऱ्यावर पन्नूच्या हत्येची योजना आखल्याचा आरोप आहे. जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपानुसार, निखिल गुप्ता याच्यावर न्यूयॉर्कमध्ये एका अमेरिकन नागरिकाच्या हत्येची सुपारी बदल्यात दिल्याचा आरोप आहे. या हत्येसाठी भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने गुप्ता याला ही जबाबदारी सोपवल्याचा आरोप आहे. यामध्ये सरकारी अधिकाऱ्याचे नाव गुपित आहे. त्याला सीसी-1 असे नाव देण्यात आले आहे.
आरोपपत्रात म्हटले आहे की, सीसी-1 च्या सूचनेवरुन गुप्ताने हत्येसाठी मारेकऱ्याचा शोध सुरु केला. यादरम्यान गुप्ता याला एक व्यक्ती भेटली. या व्यक्तीने गुप्ताची ओळख एका हिटमॅनशी (सुपारी किलर) करुन दिली. पण प्रत्यक्षात ते दोघेही अमेरिकन सरकारसाठी काम करणारे गुप्तचर स्रोत होते. आरोपपत्रात निखिल गुप्ता याचे वर्णन 'आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर' असे करण्यात आले आहे. या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरुन गुप्ताला अमेरिकेच्या विनंतीवरुन जून 2023 मध्ये चेक रिपब्लिकमधून अटक करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.