Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नसताना इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे अवघे जग चिंतेत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला आता सहा महिने पूर्ण होत आहेत. यादरम्यान इस्रायली सैन्याने गाझामध्ये कहर केला आहे. बॉम्बस्फोट आणि हवाई हल्ले यामुळे गाझामध्ये अराजकता माजली आहे. दरम्यान, गाझा पट्टीतील रफाह शहरात एका मुलीचा जन्म झाला, मात्र ती जन्मताच अनाथ झाली.
वास्तविक, इस्रायली लष्कराने शनिवारी रात्री रफाह शहरावर हवाई हल्ले केले. या हल्ल्यापासून वाचण्यासाठी लोक सैरावैरा धावत होते, जेणेकरुन आपला जीव वाचावा. या हल्ल्यांमध्ये दोन घरांतील 19 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 13 मुलांचा समावेश होता. या हल्ल्यात मुलीचे वडील, तिची 4 वर्षांची मोठी बहीण आणि तिची आई यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांना समजले की सबरीन अल-सकानी नावाची एक महिला गरोदर आहे. डॉक्टरांच्या पथकाने विलंब न करता आपत्कालीन सिझेरियन शस्त्रक्रिया केली. ज्यातून मुलीचा जन्म झाला. मात्र, या शस्त्रक्रियेदरम्यान सबरीन अल-सकानीचा मृत्यू झाला.
मुलीची काळजी घेत असलेले डॉक्टर मोहम्मद सलामा यांनी सांगितले की, मुलीचे वजन 1.4 किलो आहे. तिची आई सबरीन अल-सकानी 30 आठवड्यांची गरोदर होती. इतर लोकांचे मृतदेह बाहेर काढले जात असताना सबरीन गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ सिझेरियन करुन बाळाला वाचवण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, मुलीला वाचवणे खूप कठीण होते. आता मुलीला एमिराटी हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे, जिथे तिची काळजी घेतली जात आहे.
दुसरीकडे, मुलीचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका इन्क्यूबेटरमध्ये झोपलेली दिसत आहे. गळ्यातील टेपवरुन तिची ओळख पटली. ज्यामध्ये तिच्या आईचे नाव लिहिले होते. टेपवर लिहिले होते की, सबरीन अल-सकानीचे मूल. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यावेळी बाळ आईच्या पोटात असायला हवे होते. डॉक्टरांनी सांगितले की, मुलगी आणखी तीन ते चार आठवडे रुग्णालयातच राहील.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरु झाल्यापासून गाझामध्ये 34,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, त्यापैकी किमान दोन तृतीयांश मुले आणि महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यात अनेक लोक मारले गेले होते. यासोबतच, दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या हजारो नागरिकांना बंधकही बनवले आहे. तेव्हापासून इस्रायल हमासच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.