Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये सुरु असलेले युद्ध आता भीषण रुप धारण करत आहे. हमासबाबत इस्रायल आणखी आक्रमक झाला आहे. सततच्या बॉम्बफेकीनंतर आता इस्रायली लष्कराने गाझा शहराला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन शुक्रवारी इस्रायलला पोहोचले. यापूर्वी, त्यांनी युद्ध सुरु असताना इस्रायलला भेट दिली होती. गेल्या महिनाभरातील त्यांचा हा तिसरा इस्रायल दौरा आहे. ते येथे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि उच्च अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
पत्रकारांशी बोलताना ब्लिंकन म्हणाले की, त्यांचा दौरा गाझाच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करेल. हमासने अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेचाही त्यांनी चर्चेचा विषय म्हणून उल्लेख केला. विशेष म्हणजे, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर हमासने आपल्या 200 हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवले आहे.
त्याचवेळी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्ध शिगेला पोहोचणार असल्याचे म्हटले आहे. इस्रायली लष्कराने गाझामध्ये आपल्या जमिनीवरील कारवाई तीव्र केली असून येथे सातत्याने लढा सुरु आहे. हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी इस्रायली लष्कर आपली पूर्ण ताकद वापरत आहे.
वृत्तानुसार, गेल्या 28 दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात गाझामध्ये आतापर्यंत 9,000 लोक मारले गेले आहेत, तर 32,000 लोक जखमी झाले आहेत. या युद्धात आतापर्यंत 2,326 महिलांचा मृत्यू झाला आहे, तर 3,760 मुलेही मारली गेली आहेत. दुसरीकडे, इस्रायलवर अरब देशांचा दबावही वाढत आहे. गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यामुळे अनेक मुस्लिम देश संतप्त आहेत. हिजबुल्लाहनंतर आता हौथीही या युद्धात पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहे. युद्धामुळे गाझामध्ये गंभीर मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. तेथील सामान्य नागरिक युद्धामुळे त्रस्त झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.