PM Sher Bahadur Deuba Attack Video: नेपाळमध्ये सरकारविरोधात सुरु असलेल्या निदर्शनांनी आता हिंसक रुप धारण केले आहे. सोशल मीडियावर बंदी, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या विरोधात सुरु असलेल्या या आंदोलनात, नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांच्यावर निदर्शकांनी हल्ला केला. त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी आणि परराष्ट्र मंत्री आरजू राणा देउबा यांनाही लक्ष्य करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून त्यात देउबा गंभीर जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत दिसत आहेत.
नेपाळमधील (Nepal) तरुणाई, विशेषतः 'जनरेशन-झेड', सरकारविरोधात रस्त्यावर उतरली. या तरुणांनी अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ करुन आपला संताप व्यक्त केला. बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
दरम्यान, या हिंसक आंदोलनात केवळ माजी पंतप्रधानांवरच नाही, तर अनेक मंत्र्यांवरही हल्ले झाले आहेत. नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना रस्त्यावरच अडवून निदर्शकांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यांमुळे नेपाळमधील राजकीय अस्थिरता अधिकच वाढली आहे. तरुणांच्या या तीव्र रोषामुळे सरकारला मोठे धक्के बसले आहेत.
या हिंसक निदर्शनांच्या दबावाखाली आधी गृहमंत्री रमेश लेखक, कृषी मंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्य मंत्री प्रदीप पौडेल आणि जलपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांनी राजीनामे दिले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनाही आपले पद सोडावे लागले.
तसेच, या हिंसक जमावाने संसद भवनमध्ये घुसून तोडफोड केली आणि त्याला आग लावली. याशिवाय, माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' आणि शेर बहादूर देउबा यांच्या घरांवरही हल्ले झाले. गृहमंत्री रमेश लेखक आणि संचार मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांची घरेही जाळण्यात आली. पोलिसांनी कारवाई केली असली, तरी परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. या हिंसाचारात आतापर्यंत 21 लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.
या मोठ्या हिंसाचारानंतर नेपाळ सरकारने देशातील सोशल मीडिया साइट्सवर लावलेली बंदी अखेर मागे घेण्याची घोषणा केली. 'जेन-झेड'च्या हिंसक आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या हिंसाचारात 19 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. नेपाळचे संचार, माहिती आणि प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी मंत्रिमंडळाच्या एका तातडीच्या बैठकीनंतर सोशल मीडियावरील (Social Media) बंदी उठवल्याचे जाहीर केले. गुरुंग यांनी सांगितले की, माहिती मंत्रालयाने 'जेन-झेड' च्या मागण्यांनुसार सोशल मीडिया साइट्स पुन्हा सुरु करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे आदेश संबंधित एजन्सींना दिले आहेत.
नेपाळ सरकारने तीन दिवसांपूर्वीच फेसबुक आणि 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) सारख्या 26 सोशल मीडिया साइट्सवर बंदी घातली, कारण या कंपन्यांनी नेपाळ सरकारच्या नियमांनुसार नोंदणी केली नव्हती. सरकारचा हाच निर्णय तरुणाईच्या आंदोलनाचे एक प्रमुख कारण बनले. सध्या नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता असून पुढील सरकार कोण स्थापन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.