India Afghanistan Friendship: अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता स्थापन झाल्यापासून भारताचे सरकारशी संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. यानंतरही अफगाणिस्तानचे लोक भारताला आपला मित्र मानतात. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ब्रुसेल्सस्थित न्यूज वेबसाइट युरोपियन युनियन रिपोर्टरचे म्हणणे आहे की, या सर्वेक्षणात अफगाण लोकांना (Afghan People) त्यांच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात अफगाण नागरिकांनी सांगितले की, 'आम्ही भारताकडे सर्वात जवळचा मित्र म्हणून पाहतो.' सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 67 टक्के अफगाण नागरिकांचा असा विश्वास आहे की, अफगाणिस्तानातून (Afghanistan) अमेरिकेच्या (America) जाण्याने अडचणी निर्माण झाल्या.
दुसरीकडे, चुकीच्या वेळी अफगाणिस्तानातून अमेरिका बाहेर पडल्यामुळे पाकिस्तान आणि चीनला संधी मिळाल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर कब्जा करण्यासाठी चीनला प्रोत्साहन दिले. मात्र, अफगाणिस्तानबरोबर भारताचे धोरणात्मक हितसंबंध आहेत. भारताने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.
तसेच, अफगाणिस्तान आणि भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध बिघडवण्याचे अनेक प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आले, मात्र त्यानंतरही फारसा फरक पडलेला नाही. अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबाननेही भारताला संबंध सुधारण्याचे आवाहन केले आहे.
अफगाणिस्तानला सर्वाधिक मदत करणाऱ्या देशांपैकी भारत एक
अफगाणिस्तानला सर्वाधिक मदत देणाऱ्या देशांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. भारताने अफगाणिस्तानला 3 अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे. भारताने अफगाणिस्तानमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी तसेच वैद्यकीय कर्मचारी आणि अन्नधान्य पुरवण्यात मदत केली आहे. एवढेच नाही तर भारताने अफगाणिस्तानची नवी संसदही तयार केली. याशिवाय मोठ्या संख्येने अफगाण नागरिक भारतात उपचारासाठी येत आहेत. दुसरीकडे, भारतीय महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्येही अफगाणी लोकांची संख्या लक्षणीय आहे.
अफगाणांनी तालिबानच्या ताब्यात येण्याचे कारण सांगितले
डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये अफगाण कॅडेटही प्रशिक्षण घेत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतरही भारताने मोठ्या प्रमाणात मदत पाठवली आहे. भारतातून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गहू पाठवण्यात आला आहे. मात्र, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफगाणांनीही यापूर्वीच्या सरकारांबद्दल मत व्यक्त केले आहे. सर्वेक्षणात 78 टक्के लोकांनी आधीचे सरकारही भ्रष्ट असून परदेशातून मिळणारी मदत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे सांगितले. शिवाय, 72 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, भ्रष्ट स्थानिक नेत्यांमुळेच तालिबानला (Taliban) देश ताब्यात घेण्याची संधी मिळाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.