Afghanistan Pakistan Clash: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावर्ती संघर्ष शिगेला पोहोचला असताना परिस्थिती आता थोडी शांत झाली आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या तळांवर हवाई हल्ले केल्यानंतर अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना अफगाणिस्तानने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. अफगाण सैन्याने ड्युरंड रेषेवर असलेल्या अनेक पाकिस्तानी लष्करी चौक्यांना लक्ष्य केले आणि या हल्ल्यांमध्ये 50 हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला.
पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला केल्यानंतर अफगाण दलांनी पाकिस्तानी सैनिकांचे रणगाडे (Tanks), शस्त्रे आणि गणवेश (Uniforms) जप्त केले. आता या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात अफगाण दलाचे जवान पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्ट दाखवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाकिस्तानी सैन्याच्या नाचक्कीचे प्रतीक मानला जात आहे. मात्र 'दैनिक गोमन्तक' डिजिटल या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
दरम्यान, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत (Afghanistan) 48 तासांच्या युद्धबंदीवर (Ceasefire) सहमती दर्शवली आहे. सीमावर्ती भागात दोन्ही बाजूंनी झालेल्या चकमकीत अनेक लोक मारले गेल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या (Pakistan) परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, "तालिबानच्या विनंतीवरुन दोन्ही बाजूंच्या परस्पर सहमतीने पाकिस्तान सरकार आणि अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीदरम्यान 48 तासांच्या तात्पुरत्या युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला." या निर्णयावर बोलताना अफगाणिस्तान सरकारचे मुख्य प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, "पाकिस्तानच्या विनंतीवरुन आणि आग्रहावरुन दोन्ही देशांदरम्यान युद्धबंदी झाली."
सोशल मीडिया पोस्टमध्ये मुजाहिद यांनी आपल्या सशस्त्र दलांना निर्देश दिले की, "कोणत्याही प्रकारची चिथावणी देणारी कारवाई होत नाही, तोपर्यंत युद्धबंदी दोन्ही बाजूंकडून पाळली जाईल."
यापूर्वी, तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्ताकी यांनी स्पष्ट केले होते की, अफगाणिस्तानला कोणत्याही अन्य देशासोबत संघर्ष नको आहे. मात्र, त्यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली होती की, जर इस्लामाबादला शांतता नको असेल, तर काबूलकडे अन्य पर्याय देखील उपलब्ध आहेत.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) कडून पाकिस्तानमध्ये सातत्याने हल्ले केले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानने वारंवार अफगाणिस्तानवर असा आरोप केला की, अफगाणिस्तान आपल्या भूमीचा वापर TTP च्या अतिरेक्यांना आश्रय देण्यासाठी करत आहे. मात्र, अफगाणिस्तानने नेहमीच या आरोपांचे खंडन केले. अफगाणिस्तानकडून सांगण्यात आले की, त्यांची भूमी कोणत्याही अन्य देशाविरुद्ध वापरली जात नाही. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आणि सीमावर्ती भागातील तणावामुळे दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत नाजूक बनले आहेत.
सध्या सुरु झालेली 48 तासांची युद्धबंदी ही या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षात शांतता प्रस्थापित करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.