Mexico Rain Video: मेक्सिकोमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून अनेक भागांत भूस्खलनाच्या (Landslide) घटनाही घडल्या आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे मेक्सिकोमध्ये आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या वेराक्रूज (Veracruz) राज्यात 6 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत सुमारे 540 मिलीमीटर (21 इंचांपेक्षा जास्त) पाऊस झाला. विशेष म्हणजे, मेक्सिको सिटीपासून 275 किलोमीटर ईशान्येस असलेल्या तेल नगरी पोझा रिका (Poza Rica) येथे पूर येण्यापूर्वी कोणतीही विशेष चेतावणी (Warning) जारी करण्यात आली नव्हती.
मेक्सिकोच्या राष्ट्रीय नागरी संरक्षण समन्वय (National Civil Protection Coordination) संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांत पावसाचा मोठा फटका बसला.
हिडाल्गो राज्य (Hidalgo): मेक्सिको सिटीच्या उत्तरेकडील हिडाल्गो राज्यात शनिवारपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, येथे 150 हून अधिक समुदायांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागला.
पुएब्ला (Puebla): मेक्सिको सिटीच्या पूर्वेकडील पुएब्ला राज्यात किमान 9 लोकांचा बळी गेला आहे. याशिवाय, येथे 16,000 हून अधिक घरे एकतर पूर्णपणे नष्ट झाली आहेत किंवा त्यांना मोठे नुकसान झाले .
वेराक्रूज राज्य: या राज्यात 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलन आणि पूर यामुळे 42 समुदाय पूर्णपणे वेगळे पडले आहेत. या समुदायांतील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि नौदल मदत करत आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथक संपूर्ण प्रदेशातून बेपत्ता झालेल्या 27 लोकांचा शोध घेत आहेत. खाडी किनारी असलेल्या वेराक्रूज राज्यातील 55 नगरपालिकांमध्ये 16,000 हून अधिक घरांचे नुकसान झाले. यापूर्वी, मध्य क्वेरेटारो (Querétaro) राज्यात भूस्खलनामुळे एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे (Rain) वीज खंडित झाल्यामुळे देशभरातील 3,20,000 हून अधिक लोकांना फटका बसला.
अधिकाऱ्यांनी मेक्सिकोच्या पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या 'प्रिसिला' आणि 'रेमंड' या उष्णकटिबंधीय वादळांना (Tropical Storms) या भीषण पावसासाठी जबाबदार ठरवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.