Kerala Cricket League: विष्णू विनोद या धाकड खेळाडूने 2021 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या वादळी खेळीने छाप सोडली होती. तुफानी फलंदाजीच्या जोरावर त्याला आयपीएलमध्येही स्थान मिळाले. मात्र, इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याला पुरेसे सामने खेळायला मिळाले नाहीत, त्यामुळे तो हळूहळू मागे पडत गेला. पण आता हाच विष्णू विनोद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केरळ क्रिकेट लीग 2025 मध्ये विष्णूने आपल्या वादळी खेळीने धुमाकूळ घातला आहे.
सध्या केरळ क्रिकेट लीग मध्ये विष्णू विनोद धमाकेदार खेळी खेळत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांमध्येच त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीची छाप सोडली आहे. त्याच्या धावांपेक्षा त्याच्या अटॅकिंग अप्रोचची जास्त चर्चा होत आहे. 4 सामन्यांमध्ये त्याने एकूण 181 धावा केल्या असल्या, तरी त्याचा स्ट्राइक रेट 212 चा आहे. या लीगमध्ये विष्णूने चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले आहेत. त्याच्या बॅटमधून 10 चौकार तर 4 सामन्यांमध्ये एकूण 18 षटकार आले आहेत. या लीगमध्ये विष्णूपेक्षा जास्त षटकार कोणत्याही फलंदाजाने मारलेले नाहीत. यामध्ये संजू सॅमसनही त्याच्या मागे आहे. संजूने आतापर्यंत 16 षटकार मारले आहेत, तर विष्णूने 18 षटकार मारुन आघाडी घेतली आहे.
विष्णू विनोदने त्रिशूर टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने कहर केला. त्याने केवळ 38 चेंडूंमध्ये 86 धावांची आतिशी खेळी खेळली. आपल्या या इनिंगमध्ये त्याने 7 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार मारले. 226 च्या स्ट्राइक रेटने खेळताना विष्णूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्या या दमदार खेळीमुळे त्याचा संघ ‘अराइज कोल्लम सेलर’ 8 विकेट्सने विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.
गेल्या काही वर्षांपासून विष्णू विनोदचे नाव क्रिकेट विश्वातून काहीसे बाजूला पडले होते. पण आता या स्पर्धेत त्याने दाखवलेला फॉर्म पाहून पुन्हा एकदा तो आयपीएल फ्रँचायझींच्या नजरेत येऊ शकतो. त्याने आपल्या कामगिरीतून हे सिद्ध केले की, त्याच्याकडे आजही मॅच-विनिंग इनिंग खेळण्याची क्षमता आहे. जर त्याने हा फॉर्म असाच कायम ठेवला, तर आगामी आयपीएलमध्ये त्याचे नाव लिलावात पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.