Virat Kohli & Rohit Sharma Big Loss: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित क्रिकेट मालिका लवकरच सुरु होत आहे. मालिकेतील पहिला सामना येत्या 19 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल, मात्र त्यापूर्वीच भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) क्रमवारीमध्ये (Ranking) मोठा झटका बसला. इतकंच नव्हे, तर वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या शुभमन गिलच्या स्थानालाही आता धोका निर्माण झाला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका होणार असली तरी, सध्या सर्वाधिक चर्चा वनडे मालिकेची आहे, कारण यात विराट कोहली आणि रोहित शर्मा एकत्र खेळताना दिसणार आहेत. बुधवारी (15 ऑक्टोबर) आयसीसीने वनडे क्रिकेटची नवीन क्रमवारी जाहीर केली, ज्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही नुकसान झाल्याचे दिसत आहे.
यापूर्वी, माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आयसीसीच्या वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता, परंतु आता तो एका स्थानाने खाली घसरुन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. एवढेच नव्हे, तर माजी कर्णधार विराट कोहलीलाही एका स्थानाचे नुकसान झाले असून तो आता थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज इब्राहिम जादरानने मोठी झेप घेतली असून तो थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या वनडेच्या नवीन क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिल आपले पहिले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला. गिलचे सध्याचे रेटिंग 784 इतके आहे.
दुसरीकडे, तब्बल आठ स्थानांची झेप घेत थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या इब्राहिम जादरानचे रेटिंग आता 764 झाले. जादरानने केवळ रोहित आणि विराटलाच मागे टाकले नाही, तर तो शुभमन गिलच्याही खूप जवळ पोहोचला. गिल आणि जादरान यांच्या रेटिंगमध्ये केवळ 20 गुणांचा फरक आहे आणि हा फरक लवकरच संपुष्टात येऊ शकतो, ज्यामुळे शुभमन गिलचे पहिले स्थान धोक्यात आले आहे.
इब्राहिम जादरानने घेतलेल्या मोठ्या झेपेमुळे केवळ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाच नाही, तर अनेक आंतरराष्ट्रीय फलंदाजांना फटका बसला आहे. बाबर आझम, डेरिल मिचेल, चरित असलंका, हॅरी टेक्टर, श्रेयस अय्यर आणि शे होप या सर्व फलंदाजांना एक-एक पायरी खाली उतरावे लागले आहे.
इब्राहिम जादरानने मंगळवारी बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या वनडे सामन्यात 111 चेंडूंमध्ये 95 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. या खेळीत त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले होते. याच उत्कृष्ट कामगिरीचा फायदा त्याला यावेळी आयसीसीच्या नवीन क्रमवारीत झाला. त्यामुळे आगामी वनडे मालिकेत शुभमन गिल आणि इब्राहिम जादरान यांच्यातील पहिल्या क्रमांकासाठीची स्पर्धा आणखी रंजक होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.