Cyclist Dangerous Stunt Viral: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक व्यक्ती दिवसाचा बराचसा वेळ स्मार्टफोनवर आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घालवते. अगदी शाळकरी मुलेही याला अपवाद नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर रोज नवनवीन आणि अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात.
अनेकदा हे व्हिडिओ मनोरंजनासाठी असतात, पण कधीकधी काही लोक 'लाइक', 'शेअर' आणि 'व्ह्यूज'च्या नादात असे काही वेडगळ आणि धोकादायक कृत्य करतात की, त्याचा परिणाम त्यांच्या जीवाला धोका निर्माण करु शकतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत असून तो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.
दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Video) एक तरुण सायकल चालवताना दिसत आहे. हा तरुण रस्त्यावर चालणाऱ्या इतर वाहनांपेक्षा खूपच वेगळ्या पद्धतीने सायकल चालवत आहे. तो समोरुन येणाऱ्या गाड्या आणि बाईकच्या अगदी जवळ जातो आणि ऐनवेळी बाजूला वळून आपली सायकल काढतो. तो हे कृत्य एकदा नाही, तर अनेकवेळा करतो आणि प्रत्येक वेळी अगदी शेवटच्या क्षणी आपला जीव वाचवतो.
एका क्षणाचाही विलंब झाला, तरी तो मृत्यूच्या दाढेत सापडेल, असा तो धोकादायक स्टंट करतो. हा स्टंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि तुमचे हृदय धडधडू लागेल. हा व्हिडिओ म्हणजे मरणाला आमंत्रण देण्यापेक्षा कमी नाही. सुदैवाने, व्हिडिओमध्ये कोणताही मोठा अनर्थ घडल्याचे दिसत नाही, पण अशा कृत्यांमुळे केवळ त्याचाच नाही, तर समोरच्या वाहनचालकाचाही जीव धोक्यात येऊ शकतो.
हा व्हिडिओ केवळ एका तरुणाचा वेडगळपणा नाही, तर सोशल मीडियावर सुरु असलेल्या एका धोकादायक ट्रेंडचा भाग आहे. अनेक तरुण क्षणिक प्रसिद्धीसाठी आणि 'व्ह्यूज'च्या मागे लागून असे जीवघेणे स्टंट करताना दिसतात. अशा कृत्यांमुळे झालेले अपघात आणि त्यातून झालेल्या मृत्यूंच्या अनेक बातम्या आपण ऐकतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील लाईक्स आणि शेअर्सचे आकर्षण इतके वाढले आहे की, लोक स्वतःच्या जीवाचे आणि इतरांच्या सुरक्षिततेचे भान विसरत आहेत. या व्हिडिओतील तरुणाने हे कृत्य केवळ प्रसिद्धीसाठीच केले असल्याचा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत.
हा व्हिडिओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर '@Siimplymee1234' नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन देताना 'यमराज का भतीजा' (यमराजाचा पुतण्या) असे लिहिले आहे, जे व्हिडिओतील कृतीचे गांभीर्य दर्शवते. व्हिडिओ पाहून यूजर्संनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
एका युजरने लिहिले, "अरे भाई, एवढी काय मरण्याची घाई आहे?" तर दुसऱ्या एका युजरने "हे खूप चुकीचे आहे," असे म्हटले. आणखी एका युजरने "याला लवकर मरायचे आहे का?" असा संतप्त सवाल केला. "हा घाबरो वा न घाबरो, समोरचा नक्कीच घाबरुन जाईल," असे म्हणत एका युजरने व्हिडिओतील दुसऱ्या व्यक्तीचा विचारही मांडला. काही यूजर्संनी हा व्हिडिओ एडिट केलेला किंवा एआय (AI) तंत्रज्ञानाने तयार केलेला असल्याचा दावाही केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.