Uttarpradesh Gold Theft Case: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या गोमतीनगर येथील एका नामवंत ज्वेलरी शोरुममधून सुमारे अडीच किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या चोरीची किंमत कोट्यवधींच्या घरात असून शोरुममधील कर्मचारी कोमल श्रीवास्तव हिनेच गेल्या चार वर्षांत ही चोरी हळू-हळू केली असल्याचे समोर आले.
दरम्यान, या ज्वेलरी शोरुममध्ये कोमल श्रीवास्तव केवळ 22 हजार रुपये मासिक वेतनावर बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. मात्र, आपल्या तुटपुंज्या पगारातही ती अत्यंत आलिशान जीवन जगत होती. ही चोरी उघडकीस येताच ती आणि तिचा पती फरार झाले आहेत. शोरुमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलने स्टॉक व्हेरिफिकेशनच्या नावाखाली हळू-हळू सोने आणि दागिने लंपास केले. या 'इनसाइडर चोरी'ची सुरुवात जवळपास चार वर्षांपूर्वी झाली.
या चोरीचा उलगडा दिवाळीच्या रात्री एका सामान्य घटनेमुळे झाला. बायबॅक स्कीमअंतर्गत एका ग्राहकाने जुने सोने मागितले असता, कोमलने उत्तर दिले, "ते तर वितळवून टाकले आहे." कर्मचाऱ्याला हे उत्तर संशयास्पद वाटल्याने त्याने व्यवस्थापक धीरज डाल यांना ही माहिती दिली. व्यवस्थापक धीरज यांनी तातडीने गेल्या काही दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये कोमल सोने आणि दागिने साडीत किंवा बॅगमध्ये लपवून शोरुमच्या बाहेर नेताना स्पष्टपणे दिसली. 15 ते 16 ऑक्टोबरदरम्यान तर तिने उघडपणे दागिने कपड्यांमध्ये गुंडाळून चोरले होते.
सीसीटीव्ही आणि स्टॉकची तपासणी केल्यानंतर तब्बल अडीच किलो सोने गायब झाल्याचे उघड झाले, ज्याची बाजारपेठ किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये आहे. यापूर्वीही शोरुममधून लहान-सहान वस्तू चोरीला गेल्या होत्या, पण कर्मचाऱ्यांवर विश्वास असल्याने व्यवस्थापनाने कधीही खोलवर तपास केला नव्हता.
व्यवस्थापनाने कोमलला तिच्या घरी जाऊन सोने परत करण्याची संधी दिली, पण तिने 'जे तुमचे असेल, ते घेऊन जा,' असे उद्धट उत्तर दिले आणि ती पतीसह फरार झाली. पोलिसांनी जेव्हा तिच्या घराची तपासणी केली, तेव्हा तिच्या 'लक्झरी लाइफ'चा पर्दाफाश झाला. कोमलने याच पैशांतून 70 ते 75 लाख रुपयांचा फ्लॅट विकत घेतला होता आणि कारचे कर्जही फेडले होते. पोलिसांनी चोरी केलेले सोने वितळवून बाजारात विकले असावे, असा संशय व्यक्त केला.
या चोरीप्रकरणी गोमतीनगर पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून, तीन वर्षांतील चोरीचा कसून तपास सुरू आहे. मात्र, या केसला एक नवा ट्विस्ट मिळाला आहे. कोमलच्या पतीने महानगर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शोरुम व्यवस्थापन आणि व्यवस्थापक धीरज डाल यांनी कोमलसोबत 'अयोग्य वर्तन' केले आणि तिच्यावर खोटे आरोप केले, असा पतीचा दावा आहे.
ऑल इंडिया ज्वेलर्स फेडरेशनने या 'इनसाइडर चोरी'वर चिंता व्यक्त करत, शोरुममध्ये स्टॉक व्हेरिफिकेशन आणि सीसीटीव्ही नियमांचे कठोर पालन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. सध्या पोलीस पथके कोमल आणि तिच्या पतीचा शोध घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.