Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली. शुल्लक कारणावरुन रागाचा पारा इतका चढला की, एका नराधमाने आपल्या सख्या आईची आणि सावत्र भावाची धारदार शस्त्राने हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण खूनी खेळ केवळ 'बाथरुमला आधी कोण जाणार' या वादातून सुरु झाला होता. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण पटेहरा परिसरात एकच खळबळ उडाली.
मिर्झापूरच्या पटेहरा येथील एका वडीलोपार्जित घरात हे कुटुंब राहत होते. या घराच्या खालच्या मजल्यावर मृत आयुष गुप्ता आणि त्याची आई राहत होते, तर वरच्या मजल्यावर आरोपी राहुल गुप्ता हा एकटाच राहत होता. राहुलची पत्नी त्याला आधीच सोडून गेली होती. मंगळवारी (13 जानेवारी) सकाळी राहुल गुप्ता बाथरुमला जाण्यासाठी उठला. त्याचवेळी त्याचा सावत्र भाऊ आयुष देखील तिथे पोहोचला. "आधी मी जाणार की तू," यावरुन दोघांमध्ये किरकोळ वादावादी सुरु झाली. मात्र, हा वाद इतका विकोपाला गेला की राहुलने रागाच्या भरात घरातून धारदार चाकू आणला आणि आयुषवर सपासप वार केले.
दोन भावांमधील आरडाओरडा ऐकून त्यांची आई तिथे पोहोचली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी ती पुढे सरसावली, पण क्रूरतेची सीमा ओलांडलेल्या राहुलने रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या आईवरही हल्ला केला. त्याने आईचीही निर्घृण हत्या केली. अवघ्या काही मिनिटांत राहुलने आपल्याच कुटुंबातील दोन जणांचा खात्मा केला.
दोघांची हत्या केल्यानंतर राहुल शांत बसला नाही. त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी दोन्ही मृतदेह घराबाहेर नेले. त्याने सावत्र भाऊ आयुषचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला, तर आईचा मृतदेह जवळच असलेल्या एका कालव्यात फेकला. सकाळी रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवले.
मिर्झापूर पोलिसांनी (Police) तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि संशयाच्या आधारावर राहुल गुप्ताला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ बाथरुमचा वाद हे तात्कालिक कारण असले तरी या दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वडीलोपार्जित मालमत्तेवरुन वाद सुरु होता. मालमत्तेच्या वादातून मनात साठलेला राग बाथरुमच्या शुल्लक कारणाने उफाळून आला आणि त्याचे रुपांतर दुहेरी हत्याकांडात झाले.
पोलिसांना आयुषचा मृतदेह मिळाला आहे, मात्र कालव्यात फेकलेल्या आईच्या मृतदेहाचा शोध अद्याप सुरु आहे. पोलिसांनी आरोपी राहुल गुप्ताला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा (BNS संबंधित कलमान्वये) गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.