Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच आपली लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. मुलगी बनण्याच्या इच्छेने त्याने हे धोकादायक पाऊल उचलले. या घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, हा विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून मानसिक संघर्षातून जात होता. त्याला मुलगी बनण्याची तीव्र इच्छा होती, मात्र याबद्दल कोणाशी बोलावे हे त्याला समजत नव्हते. यातूनच त्याने चुकीचा मार्ग अवलंबला. त्याने याबद्दल मदत मिळवण्यासाठी इंटरनेटचा आधार घेतला. त्याने गुगल आणि युट्यूबवर 'लिंगबदल शस्त्रक्रिया कशी करावी' या संदर्भात माहिती शोधायला सुरुवात केली.
दरम्यान, या शोधात त्याला एक व्हिडिओ सापडला ज्यात एका डॉक्टरने लिंगबदल शस्त्रक्रियेची पद्धत सविस्तर सांगितली होती. हा व्हिडिओ पाहून त्याने स्वतःच ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याने कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेतला नाही किंवा कोणत्याही योग्य प्रक्रियेचे पालन केले नाही. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याने स्वतःला भुलीचे इंजेक्शन दिले, जेणेकरुन त्याला वेदना जाणवणार नाहीत. त्यानंतर त्याने एक धारदार शस्त्र वापरुन स्वतःचे लिंग कापले. यानंतर त्याने स्वतःच जखमेवर पट्टीही बांधली.
दुसरीकडे, या घटनेनंतर काही काळ त्याला काही जाणवले नाही. मात्र, जेव्हा भुलीच्या औषधाचा प्रभाव कमी झाला, तेव्हा त्याला असह्य वेदना होण्यास सुरुवात झाली. वेदनांच्या तीव्रतेमुळे तो कळवळू लागला. त्याला झालेली दुखापत खूप गंभीर असल्याने रक्तस्रावही मोठ्या प्रमाणात झाला. कुटुंबीयांना किंवा मित्रांना याची माहिती मिळाल्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या तो विद्यार्थी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि धोकादायक असते. ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली केली जाते. चुकीच्या पद्धतीने केलेल्या या शस्त्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणे, संसर्ग पसरणे, आणि जीवावर बेतणे यांसारखे धोके संभवतात. दुर्दैवाने या विद्यार्थ्याने हे सर्व धोके पत्करले.
समाजासाठी ही घटना एक गंभीर इशारा आहे. अशा परिस्थितीत व्यक्तीला नैतिक किंवा सामाजिकदृष्ट्या योग्य-अयोग्य ठरवण्याऐवजी, त्याला मदत आणि सहानुभूतीची गरज असते. कुटुंबीयांनी आपल्या पाल्याशी मोकळेपणाने संवाद साधणे, त्यांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष देणे आणि गरज पडल्यास त्यांना व्यावसायिक मदत मिळवून देणे, हे अत्यावश्यक आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरु असून यातून पुढे आणखी काही माहिती समोर येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.