दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला. राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला. यासोबतच कोर्टाने केजरीवालांना 6 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले. केजरीवाल यांना आता 28 मार्च रोजी कोर्टात हजर केले जाणार आहे. दिल्लीतील कथित दारु घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी संध्याकाळी अटक केली होती.
यातच आता, एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हे पत्र लिहिले आहे. सुकेशने तुरुंगातून हे पत्र लिहिले. केजरीवाल यांना ईडीकडून रिमांड मिळाल्यानंतर त्याने हे पत्र लिहिले आहे. सुकेशने केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात स्वागत करणारे पत्र लिहिले. सुकेशने पत्रात लिहिले की, ''Dear Brother, तिहारमध्ये आपले स्वागत आहे.' नेहमीप्रमाणे सत्याचा विजय झाला, असे सुकेशने पत्रात लिहिले आहे. देशात कायद्यापेक्षा कोणीही वरचढ नाही हे दाखवण्यासाठी नव्या भारताच्या शक्तीचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. Dear Brother अरविंद केजरीवाल जी, सर्वप्रथम मी तुमचे स्वागत करतो. सुकेशने केजरीवाल यांचे तिहार क्लबचे ‘बॉस’ असे वर्णन केले. सोबत तुमची सर्व विधाने आणि धर्मांध प्रामाणिकपणाचे नाटक आता संपुष्टात आले, असेही त्याने पत्रात पुढे लिहिले.
सुकेशने पुढे उपरोधिकपणे लिहिले की, ''मी खूप भाग्यवान आहे की माझा वाढदिवस 25 मार्चला आहे. हा दिवस माझ्यासाठी डबल सेलिब्रेशनचा आहे, कारण मी तुमच्या अटकेला माझ्या वाढदिवसाची सर्वोत्तम भेट मानतो. केजरीवाल जी, सत्य जास्त काळ लपून राहू शकत नाही. केजरीवाल जी, तुमचा सगळा भ्रष्टाचार उघड होणार आहे, तुम्ही मुख्यमंत्री असताना 10 वेगवेगळे घोटाळे केले. त्याचबरोबर दिल्लीच्या भोळ्याभाबड्या जनतेला तुम्ही लुटले. मी स्वतः तुमच्या 4 घोटाळ्यांचा साक्षीदार आहे. मी तुमचा पूर्णपणे पर्दाफाश करेन. तुम्हाला ज्या 4 घोटाळ्यांची भीती वाटत होती, त्यामध्ये तुमच्याविरुद्ध मी साक्षीदार बनीन. दिल्ली अबकारी प्रकरण ही तर सुरुवात आहे.''
सुकेशने पुढे लिहिले की, ''तुम्ही एका गोष्टीबद्दल बरोबर आहात, हे रामराज्य आहे. तुम्हाला तुमच्या भ्रष्टाचाराची आणि कर्माची शिक्षा स्वतः भगवान श्रीरामांनी दिली आहे. देव सर्व काही पाहत आहे, विशेषत: तुमचा अहंकार, तुमची लबाडी आणि लोकांच्या भावनांशी खेळणे हे कधीही न पटणारे आहे. मला माहित आहे की, तुम्हाला तुरुंगात जाण्याने काही फरक पडत नाही, कारण तुरुंग पूर्णपणे तुमच्या ताब्यात आहे आणि तुरुंग अधिकारी तुमचे बाहुले आहेत, पण मी ते उघड करेन. केजरीवाल जी, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी मला एक मोठा ठग घोषित केला.''
सुकेशने पत्रात पुढे लिहिले की, ''शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या तिहार क्लबमधून विधानसभेची निवडणूक लढवाल. मी तुम्हाला निराश करणार नाही, मी तुमच्याच सीटवरुन तुमच्या विरोधात निवडणूक लढवून माझा प्रामाणिकपणा सिद्ध करेन. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आणि तुमचे सर्व भ्रष्ट सहकारी आणि तुमची तथाकथित आम आदमी पार्टी संपुष्टात येईल आणि दिल्लीची जनता तुम्हाला कायमची हाकलून देईल.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.