Sai Sudharsan Record: वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड झाल्यानंतर सातत्याने टीका सहन करत असलेल्या साई सुदर्शनने अखेर दुसऱ्या कसोटीत मोठी खेळी साकारत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. जरी त्याला शतक पूर्ण करता आले नाही, तरी त्याने या सामन्यात जे केले, ते 23 वर्षांनंतर पुन्हा एकदा पाहायला मिळाले. 2002 मध्ये दिल्लीत घडलेला तोच इतिहास आता पुन्हा याच मैदानावर ताजा झाला.
साई सुदर्शनने नुकतेच कसोटी संघात पदार्पण केले असून, यापूर्वीच्या तीन सामन्यांत तो मोठी खेळी करु शकला नव्हता. मात्र, आता त्याने केलेले काम निश्चितच मोठे आणि प्रशंसनीय आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात साई सुदर्शनने 165 चेंडूंमध्ये 87 धावांची दमदार खेळी खेळली. या खेळीत त्याने 12 चौकार मारले. हे साईच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये 61 धावा केल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर (Number 3) फलंदाजी करताना एखाद्या डावखुऱ्या (Left-Handed) फलंदाजाने इतकी मोठी खेळी खेळण्याची घटना तब्बल 23 वर्षांनी घडली. यापूर्वी 2002 मध्ये सौरव गांगुली (Sourav Ganguly) भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. गांगुली हा देखील डावखुरा फलंदाज होता. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 136 धावांची शतकी खेळी खेळली होती.
गांगुलीच्या त्या शतकानंतर आजपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोणत्याही डावखुऱ्या भारतीय फलंदाजाला शतक ठोकता आलेले नाही. साई सुदर्शन शतकाच्या अगदी जवळ होता, पण तो पूर्ण करु शकला नाही. विशेष म्हणजे, सौरव गांगुलीने जेव्हा हे शतक ठोकले होते, तेव्हा ते दिल्लीच्याच मैदानावर (अरुण जेटली स्टेडियम) होते आणि आता साई सुदर्शनने ही 87 धावांची मोठी खेळी देखील दिल्लीच्या याच मैदानावर साकारली.
गांगुलीच्यानंतर अनेक वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी राहुल द्रविडने (Rahul Dravid) तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. द्रविडच्या निवृत्तीनंतर ही भूमिका चेतेश्वर पुजाराने स्वीकारली. द्रविड आणि पुजारा या दोघांनीही कसोटीत मोठ्या धावा केल्या, मात्र हे दोन्ही फलंदाज उजव्या हाताचे (Right-Handed) होते. अनेक वर्षांनी असे घडले की, भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी एका डावखुऱ्या फलंदाजाला मिळाली आणि साई सुदर्शनने ही संधी साधत एक मोठी खेळी खेळून 23 वर्षांचा इतिहास ताजा केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.