नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देणारी भारताची एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे. या प्रणालीचे नुकसान झाल्याच्या बातम्या भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्या आहेत. "एस-४०० प्रणालीचे नुकसान झाल्याच्या किंवा ती उद्ध्वस्त झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत," असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
दरम्यान, पाकिस्तानने भारतात २६ ठिकाणी केलेल्या हल्ल्यांना भारतीय सशस्त्र दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवर (LoC) अनेक ठिकाणी अजूनही दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरूच आहे. शनिवारी (दि.10) पहाटे भारतीय जवानांनी पाकिस्तानमधील चार हवाई तळांना लक्ष्य केले. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असताना, भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर त्वरित आणि प्रभावी कारवाई केली.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "पाकिस्तानसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर २६ ठिकाणी ड्रोन दिसले आहेत. यात शस्त्रे असलेले ड्रोन असण्याची शक्यता आहे. बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपुरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, फाजिल्का, लालगढ जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लखी नाला या ठिकाणांचा त्यात समावेश आहे.
दुर्दैवाने, फिरोजपूरमधील एका नागरी वस्तीला एका शस्त्रधारी ड्रोनने लक्ष्य केले, ज्यामुळे एका स्थानिक कुटुंबातील सदस्य जखमी झाले असल्याने जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे आणि सुरक्षा दलांनी परिसराची पाहणी करून परिसर सुरक्षित असल्याची खात्री केलीये.
भारतीय सशस्त्र दल पूर्णपणे सतर्क आहेत आणि अशा सर्व हवाई धोक्यांचा मागोवा घेऊन प्रति-ड्रोन प्रणालीचा वापर करून त्यांना निष्प्रभ करत आहेत. परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवले जात आहे आणि जिथे आवश्यक असेल तिथे त्वरित कारवाई केली जात आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांनी घरातच राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सुरक्षा सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. घाबरण्याची गरज नसली तरी, सतर्कता आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.