Rahul Gandhi: काँग्रेसने आपल्या राजवटीतील सर्व राज्यांमध्ये जातनिहाय सर्वेक्षण करण्याची घोषणा केली आहे.
बिहारमधील महाआघाडी सरकारने जातनिहाय सर्वेक्षण केल्यानंतर देशभरात विरोधकांकडून त्याबाबत वातावरण निर्माण केले जात आहे. दरम्यान, सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी ही घोषणा केली.
राहुल म्हणाले की, आज संपूर्ण देशाला जातनिहाय सर्वेक्षण हवे आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या शेजारी बसून राहुल गांधी म्हणाले की, आम्ही आमच्या सत्तेखालील सर्व राज्यांमध्ये जातनिहाय सर्वेक्षण करु.
राहुल म्हणाले की, आमचे चार मुख्यमंत्री आहेत, त्यातील तीन ओबीसी प्रवर्गातील आहेत. भाजपकडे 10 मुख्यमंत्री असून त्यापैकी फक्त एक ओबीसी आहे. काही दिवसांनी ओबीसी मुख्यमंत्रीही होणार नाहीत.
संसदेत (Parliament) बोलताना मी उदाहरण दिले होते की, देशातील 90 सचिवांपैकी फक्त तीन ओबीसी प्रवर्गातील आहेत. मात्र याबाबत सरकारने काहीही सांगितले नाही.
यावरुन हे स्पष्ट होते की, देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास 50 टक्के लोकांचा सत्तेत सहभाग नसावा असे नरेंद्र मोदी मान्य करतात. ओबीसी समाजाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे त्यांचे काम आहे.
आम्ही कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जातनिहाय सर्वेक्षण करु, असे राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितले. याशिवाय, ज्या राज्यांमध्ये आमचे सरकार येईल तिथेही आम्ही असे निर्णय घेऊ.
हिंदू समाजात फूट पाडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपावर राहुल म्हणाले की, समाजाचा एक्स-रे काढला पाहिजे, हे आमचे ध्येय आहे. कोणी जखमी झाल्यास संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपण एक्स-रे काढतो.
राहुल पुढे म्हणाले की, पंतप्रधान एक्स-रेला का घाबरतात याचे मला आश्चर्य वाटते. त्यांना यावरुन लोकांचे लक्ष का हटवायचे आहे?
आम्हाला देशातील बहुसंख्य जनतेला त्यांचे हक्क मिळवून द्यायचे आहेत, असेही काँग्रेस खासदार राहुल पुढे म्हणाले. राहुल म्हणाले की, जात सर्वेक्षणानंतर आम्ही आर्थिक सर्वेक्षणही करु.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एका निवडणूक रॅलीत काँग्रेसला हिंदू समाजात फूट पाडायची आहे, असे म्हटले होते.
ते म्हणाले होते की, आज लोकसंख्येनुसार अधिकारांची चर्चा होते, मग हिंदू समाजाने पुढे येऊन आपले हक्क मिळवायचे का? असे असेल तर अल्पसंख्याकांचे काय होणार?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.