Punjab Govt on Land in Goa: पंजाब सरकारमधील पर्यटन विभागाच्या मालमत्तेबाबत पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी मोठा निर्णय घेतला.
माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते चरणजीतसिंग चन्नी यांनी ही जमिन खासगी हॉटेलला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, हा करार रद्द करण्याचा आदेश आता मुख्यमंत्री मान (CM Bhagwant Mann) यांनी दिला आहे.
पंजाब सरकारच्या मालकीची ही आठ एकर जागा एका खासगी हॉस्पिटॅलिटी कंपनीला महिन्याला एक लाख रुपये भाडे देऊन देण्यात आली होती.
देशातील प्रमुख पर्यटन स्थळावरील सरकारी मालमत्ता केवळ एक लाख रुपयांना भाडेतत्त्वावर कशी दिली जाऊ शकते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते.
पंजाबच्या पर्यटन विभागाने आता या कंपनीला नोटीस पाठवणार असल्याचे कळते. त्यात पंजाब सरकार हा करार रद्द करत असल्याचे म्हटले जाणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संबंधित बातमीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, गोवा सरकारने राज्यातील सी-फेसिंग रिसॉर्ट्सची बंधने शिथिल केली आहेत. त्यामुळे सरकारला भाडेपट्टी रद्द करण्याची संधी मिळाली होती.
पंजाब सरकार ही आता मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यासाठी नव्याने निविदा मागवणार आहे. त्यातून राज्याच्या तिजोरीसाठी लीजमधून दरमहा चांगली रक्कम मिळण्याची आशा आहे.
“आम्हाला प्रथम नोटीस जारी करावी लागेल आणि त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा करावी लागेल. पाहुया काय होते. पण या करारानुसार लीजची रक्कम अत्यंत कमी होती,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी, दक्षता ब्युरोने आयएएस अधिकाऱ्याकडून प्राथमिक अहवाल मिळाल्यानंतर सीएम मान यांच्या निर्देशानुसार, लीज कराराशी संबंधित विसंगतींचा तपास सुरू केला होता.
पंजाबच्या वरिष्ठ अधिकार्यांनी गोवा सरकारमधील अधिकार्यांशी संपर्क साधून जमिनीची किंमत तसेच सरकार स्वतःचे रिसॉर्ट उभारू शकते का, याची पडताळणी केली होती. त्यानंतर सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी एका अधिकाऱ्याने गोव्याला भेटही दिल्याचे समजते.
सरकारी बाजूने भाडेपट्टा करार रद्द करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पंजाब हेरिटेज अँड टुरिझम प्रमोशन बोर्डाने ही मालमत्ता बोली लावणाऱ्याला भाड्याने दिली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.