Prayagraj Cash Recovery Dainik Gomantak
देश

VIDEO: बापरे, हे तर पैशांचं घबाड! जमिनीखाली पुरलेल्या तीन ड्रममधून तब्बल 3 कोटी 20 लाखांची रोकड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

Prayagraj Cash Recovery: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जमिनीखाली लपवून ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकडप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.

Sameer Amunekar

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जमिनीखाली लपवून ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकडप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. एका घराच्या जमिनीखाली पुरून ठेवलेल्या तीन निळ्या ड्रममधून तब्बल ३ कोटी २० लाख ९३ हजार रुपयांची रोकड आढळली आहे. आयकर विभागाच्या पथकाने या नोटांची मोजणी पूर्ण केली असून, एवढी मोठी रक्कम नेमकी कुठून आली, याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, नोटांची मोजणी पूर्ण झाली असली तरी संबंधित घरात अद्याप खोदकाम सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जमिनीखाली पुरलेल्या तीन ड्रममध्ये सापडली कोट्यवधींची रोकड

उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या गंगानगर विभागातील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बरईपूर रामनगर गावात हा प्रकार उघडकीस आला. २८ ऑक्टोबर रोजी एका घराच्या जमिनीखाली पुरून ठेवलेले तीन निळे ड्रम आढळले होते. या ड्रममध्ये मोठ्या प्रमाणात रोकड भरून ठेवण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच आयकर विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ड्रममधील नोटांची मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अखेर ही मोजणी पूर्ण झाली असून, एकूण ३ कोटी २० लाख ९३ हजार रुपये मिळाल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जमिनीखाली लपवून ठेवल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

नोटांची मोजणी पूर्ण, मात्र घरातील खोदकाम सुरूच

ड्रममधील रोकड मोजण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी आयकर विभागाची कारवाई अद्याप थांबलेली नाही. ज्या घरात ही रोकड लपवून ठेवण्यात आली होती, त्या घराच्या विविध भागांमध्ये खोदकाम केले जात आहे.

घरातील खोल्या आणि अंगणात मजुरांच्या मदतीने जमीन खोदली जात आहे. आणखी काही रोकड किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू जमिनीखाली लपवून ठेवल्या असण्याची शक्यता तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे घराच्या आतील आणि बाहेरील परिसराची तपासणी केली जात आहे. तपासादरम्यान कोणतीही महत्त्वाची माहिती दुर्लक्षित होऊ नये, यासाठी आयकर विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

रोकड नेमकी कुठून आली? राजेश आणि राकेश यादव यांची चौकशी

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एवढी मोठी रक्कम नेमकी कुठून आली? आयकर विभागाचे अधिकारी या पैशांचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

घरात राहणाऱ्या राजेश यादव आणि राकेश यादव यांची चौकशी केली जात आहे. घराच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण तपास प्रक्रियेवर लक्ष ठेवता येत आहे. जमिनीखाली पैसे लपवण्यामागे नेमके काय कारण होते, या रकमेचा कोणत्या व्यवहारांशी संबंध आहे आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. चौकशी आणि खोदकामातून या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात घराच्या पायासाठी खोदकाम करताना सापडला १०० वर्षांपूर्वीचा खजिना

दरम्यान, मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातही घराच्या खोदकामादरम्यान ऐतिहासिक खजिना सापडल्याची घटना समोर आली होती. भानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरखेडी गावात घराच्या बांधकामासाठी पाया खोदला जात असताना १०० वर्षांहून अधिक जुनी ७०० पेक्षा जास्त चांदीची नाणी आढळली होती.

ही नाणी ब्रिटिश राजवटीच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. त्यावर १९०४ च्या आसपासचे चिन्ह असल्याची माहिती समोर आली होती. नाणी सापडल्यानंतर घरमालक, मजूर आणि इतर काही व्यक्तींनी ती आपापसात वाटून घेतल्याचा आरोप आहे. नाण्यांच्या संख्येवरून वाद निर्माण झाल्यानंतर हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर भानपुरा पोलिसांनी तपास सुरू केला.

चांदीची नाणी आणि रोख रक्कम जप्त

या प्रकरणात पोलिसांनी घरमालक प्रेमसिंह भाटी, मजूर जीतमल बैरागी आणि दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत १४४ चांदीची नाणी आणि २ लाख ३८ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, चांदीच्या शुद्धतेनुसार एका नाण्याची किंमत सुमारे ४ हजार रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, या नाण्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यांची वास्तविक किंमत किती आहे, याचे मूल्यांकन केले जात आहे.एकूण किती नाणी सापडली होती आणि उर्वरित नाणी कोणाकडे आहेत, याचाही तपास सुरू आहे.

प्रयागराजमधील जमिनीखाली लपवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकडप्रकरणामुळे पुन्हा एकदा अशा गुप्त संपत्तीच्या प्रकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आयकर विभागाच्या पुढील तपासातून या पैशांचा स्रोत आणि त्यामागील कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT