समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचे आज निधन झाले. मुलायम यांच्यावर मागील काही दिवसांपासून युरिन इन्फेक्शनमुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचार सुरू होते. आज वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे निधन झालं. मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तर, एकदा केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत देखील मुलायमसिंह यांचे नाव होते मात्र, या शर्यतीत ते मागे पडले.
सुरूवातीचे आयुष्य
मुलायम सिंह यादव यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1939 मध्ये उत्तर प्रदेशच्या सैफईमध्ये झाला. मुलायम सिंह यादव यांना चार भाऊ आणि एक बहीण होती. मुलायम सिंह यादव यांनी 1955 ते 1959 मध्ये करहल येथील जैन इंटर कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे तिथेच शिक्षक म्हणून काम केले. 1963 मध्ये ते करहलच्या जैन इंटर कॉलेजमध्ये सहायक अध्यापक म्हणून रुजू झाले. तिथेच सलग 10 वर्ष त्यांनी सहायक अध्यापक म्हणून काम केलं.
राजकीय प्रवास
मुलायम सिंह यादव 1967 मध्ये पहिल्यांदा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1992 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 5 डिसेंबर 1989 ते 24 जानेवारी 1991, 5 डिसेंबर 1993 ते 3 जून 1996 आणि 29 ऑगस्ट 2003 ते 11 मे 2007 या तीन वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
मुलायम सिंह यादव 1996 मध्ये मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. यावेळी एच.डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकार स्थापन झाले. यामध्ये मुलायम सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.
पंतप्रधानपदाचे स्वप्न भंगले
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारखे मुलायम सिंह यादव यांचे देखील पंतप्रधान होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मुलायम सिंह यांना पंतप्रधान करण्याची जोरदार चर्चा होती. पण नातेवाईकांनी साथ न दिल्याने पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणारे मुलायम सिंह मागे पडले. लालू प्रसाद यादव आणि शरद यादव यांनी मुलायम सिंह यादव पंतप्रधानपदाच्या मनसुबे हाणून पाडले.
कुस्तीची आवड
मुलायम सिंह यादव यांनी कुस्तीची आवड कायम जपली. मुलायम सिंह आमदार नत्थू सिंह यादव यांच्या संपर्कात आले आणि त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. नत्थूसिंह यांनी जसवंतनगर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मुलायम सिंह यांच्यावर सोपवली. त्यानंतर मुलायम सिंह यादव यांचा पहिल्यांदा आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते संरक्षणमंत्री असा प्रवास झाला.
विशेष म्हणजे मुलायम सिंह यादव यांनी बॉलिवूडचे महानायक ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावानं महाविद्यालय देखील सुरु केलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.