भारतातील सोशल मीडिया ट्रोलर्सनी आता आणखी एक सावज शोधले आहे. यावेळी हे ट्रोलर्स दुसरे तिसरे कोणी नव्हे तर भारताचे सरन्यायाधिश डी. वाय चंद्रचूड यांना लक्ष्य करत आहेत.
मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे सह प्राध्यापक जॉयजीत पाल आणि त्याच संस्थेतील संशोधक श्रेईल अग्रवाल यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात, हे ट्रोलर्स चंद्रचूड हे “परकीय एजंट, लोकशाहीला धोका आणि अंतर्गत शत्रू” असल्याचा आरोप करत आहेत, असा खुलासा केला आहे.
या शोधननिबंधानुसार, ज्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन चंद्रचूड यांना सर्वात जास्त ट्रोल केले त्यांचे भारतीय जनता पक्षाशी जवळचे संबंध आहेत.
सरन्यायाधिश डी. वाय चंद्रचूड यांना हंगेरियन-अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी यासारख्या संस्थानी ब्रेनवॉश केले आहे. तसेच चंद्रचूड हे जागतिक हितसंबंधांना महत्त्व देत असल्याची टीका ट्रोलर्स सातत्याने करत असल्याचे शोधनिबंधात म्हटले आहे.
गेल्या काही काळात जॉर्ज सोरेस यांनी भारताविषयी केलेल्या वक्तव्यामुळे, सोरेस भारतीय जनता पक्षाच्या टिकेचे धनी ठरले आहेत. सोरेस भारतीय लोकशाही अस्थिर करत असल्याचा आरोपही भाजपच्या अनेक नेत्यांनी केला होता.
डी. वाय चंद्रचूड यांनी जेंडर इक्विलीटीबाबत कायमच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळेही त्यांना अनेकवेळा ट्रोल करण्यात आले आहे. तसेच चंद्रचूड यांची वैचारिक स्थिती भारतीय वास्तवापासून वेगळी असल्याचेही ट्रोलर्स सातत्याने म्हणत असतात.
हिंदूवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चंद्रचूड उदासीन असतात. तसेच त्यांचे अल्पसंख्यांकांबद्दलचे न्यायनिवाडे याचा दाखला देत, सरन्यायाधिश हिंदू विरोधी असल्याचाही आरोप करतात, असे प्राध्यापक जॉयजीत पाल आणि श्रेईल अग्रवाल यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.
चंद्रचूड यांनाला ट्रोल करणारे बहुतेक सोशल मीडिया खाती ही भाजपशी संबंधित किंवा भाजपचा पाठींबा असलेली आहेत. असे असले तरी या ट्रोलिंग मध्ये मुख्य प्रवाहातील माध्यमे किंवा राजकारण्यांचा कोणताही सहभाग नसल्याचे या शोधनिबंधात नमूद करण्यात आले आहे.
या संशोधनासाठी प्राध्यापक जॉयजीत पाल आणि श्रेईल अग्रवाल यांनी सरन्यायाधिश यांच्याशी संबंधित 1 जानेवारी ते 20 एप्रिल 2023 केलेले ट्विट्स तपासले. यामध्ये असे समोर आले की, चंद्रचूड यांच्या विरोधात सर्वाधिक ट्विट करणाऱ्यांमध्ये ‘इस्कॉन’चे प्रवक्ते रामधरम दास आणि OpIndia या उजव्या विचारसरणीच्या संकेतस्थळाचे स्तंभलेखक अभिजीत अय्यर यांचा समावेश आहे.
तसेच चंद्रचूड यांना ट्रोल करणाऱ्यांमध्ये नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असलेल्या राम प्रसाद नावाच्या एका व्यक्तीचाही समावेश आहे. चंद्रचूड यांना काही ठराविक लोकं सातत्याने ट्रोल करतच होती, पण यामध्ये अशा अनेक लोकांचा समावेश आहे, ज्यांचा उजवी विचारसरणी कींवा भाजपशी संबंध नाही.
शोधनिबंधानुसार, चंद्रचूड यांच्यापूर्वी त्यांचे वडील वाय.व्ही. चंद्रचूड यांनीही भारताचे 16 वे सरन्यायाधिश म्हणून काम केले आहे. त्यामुळे सरन्यायाधिश चंद्रचूड हे घरणेशाहीचे लाभार्थी असल्याचा आरोप होत असतो. कॉलेजियम पद्धत उपेक्षित समुदायांचे प्रतिनिधित्व नाही असे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे चंद्रचूड यांच्यावर जातीवादी असल्याची टीकाही होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.