Samandar Patel Video: मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह भाजपमध्ये सामील होऊन काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडणारे आमदार समंदर पटेल यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षात घुसमट झाल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे.
मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूका जवळ आल्याने राज्यात पक्षांतराचे वारे सुरू झाले आहे. पटेल सिंधिया यांच्या जवळचे असल्याने त्यांना हा मोठा झटका मानला जात आहे. नीमच जिल्ह्यातील जवाद विधानसभा मतदारसंघाचे ते नेतृत्व करतात.
प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. 1200 वाहनांचा ताफा आणि त्यांच्या जवळपास 5,000 समर्थकांसह भोपाळला पोहोचलेल्या समंदर पटेल यांचे कमलनाथ यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
समंदर पटेल यांनी 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पडले. आता समंदर पटेल यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये पुनरागमन करत सत्ताधारी पक्षात घुसमट होत असल्याचा आरोप केला.
समंदर पटेल यांनी 1200 वाहनांच्या ताफ्यासह भाजप कार्यालय गाठले आणि राजीनामा सुपूर्द केला. यानंतर ते ताफ्यासह काँग्रेस कार्यालयात पोहोचले. समंदर पटेल हे सिंधिया यांचे तिसरे निष्ठावंत आहेत जे अलिकडच्या काही महिन्यांत काँग्रेसमध्ये परतले आहेत.
14 जून रोजी, शिवपुरीचे भाजप नेते बैजनाथ सिंह यादव यांनी यापूर्वी भाजपला रामराम ठोकला आहे. सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करताच समंदर पटेल यांच्या अडचणी सुरू झाल्या होत्या. राज्याचे कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश सकलेचा यांच्याशी त्यांचा वाद झाला होता.
"मी सिंधिया यांच्यासोबत काँग्रेस पक्ष सोडला, पण भाजपमध्ये माझी घुसमट होऊ लागली. मला कोणत्याही कार्यक्रमाला बोलावण्यात आले नाही आणि मला सन्मान किंवा अधिकारही दिले गेले नाहीत." असा आरोप समंदर पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना केला.
समंदर पटेल दुसऱ्यांदा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. 2018 मध्ये तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु मार्च 2020 मध्ये, जेव्हा सिंधिया यांनी काँग्रेसशी बंड केले, तेव्हा समंदर पटेल यांचाही त्यांना पाठिंबा देणाऱ्या 22 काँग्रेस आमदारांमध्ये समावेश होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.