म्हापसा : पर्यावरण चळवळीला केवळ दिशाच नाही, तर विज्ञानाचा भक्कम पाया देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ (वय ८३) यांचे बुधवारी पुण्यात निधन झाले. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या अखेरच्या प्रवासाला फारच मोजके लोक उपस्थित होते.
पर्यावरण चळवळीतील ‘सह्याद्री’ ढासळला असताना, पुण्यातील नवी पेठ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी जेमतेम ४० ते ५० लोकांनीच उपस्थिती लावली होती. कोणताही व्हीआयपी, मंत्री किंवा बडा नेता तेथे फिरकला नव्हता.
अगदी स्थानिक आमदारही अनुपस्थित होते. हा एकाकी प्रवास पाहून मळयाळम मनोरमा या नामांकित वृत्तपत्राचे फोटो एडिटर आर. एस. गोपन यांनी अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे.
कोकण ते केरळपर्यंत पश्चिम घाटाच्या पर्यावरण संवर्धनासाठी आयुष्य समर्पित केलेल्या दिवंगत गाडगीळ यांच्या अंत्ययात्रेचे वार्तांकन करण्यासाठी गोपन पुण्यात आले होते. अंत्यविधीनंतर आपल्या भावना शब्दांत मांडताना ते लिहितात की, “मोठी गर्दी असेल, असा अंदाज घेऊन निघालो होतो. पण नवी पेठेत पोहोचलो तेव्हा क्षणभर रस्ता चुकलो की काय, असे वाटले.”
पार्थिव अर्धा तास होते पडून...
अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार होते; परंतु तिथे तैनात केलेले पोलीस कर्मचारीही रस्ता चुकल्याने पार्थिव तब्बल अर्धा तास तसेच पडून होते. पद्मभूषण आणि संयुक्त राष्ट्रांच्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या
व्यक्तिमत्त्वाचे पार्थिव एखाद्या अनाथासारखे पांढऱ्या वस्त्रात शांतपणे निजले होते, असे गोपन यांनी नमूद केले आहे. आजूबाजूची झाडे मात्र स्तब्ध उभी होती.
वाऱ्याच्या सौम्य झुळकींसोबत डुलत ती जणू आपल्या पद्धतीने मानवंदना देत होती, असेही गोपन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.