Jallianwala Bagh Massacre Untold Truths
देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाला अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागले, अनेक वीरांचे बलिदान पाहावे लागले. स्वातंत्र्यलढयातील एक महत्वाची घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. ज्या घटनेमुळे स्वातंत्र्यलढ्याला वेगळे वळण लागले आणि ब्रिटिशांनी क्रूरपणाची सीमा गाठली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काळा दिवस म्हणून आपण जालियनवाला बाग अर्थात अमृतसर हत्याकांड या घटनेकडे बघतो.
१३ एप्रिल १९१९ या दिवशी बैसाखी साजरी होत असताना अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळील जालियनवाला बागेत शांतता सभेसाठी जमलेल्या हजारो भारतीयांवर जनरल डायरच्या आदेशानुसार गोळीबार करण्यात आला होता.
या क्रूर घटनेत हजारो भारतीय मारले गेले. निर्दयी इंग्रज सरकारने यात ३७९ लोक मारले गेले अशी नोंद केली होती. प्रत्यक्षात मात्र हजारोपेक्षा जास्त लोकांनी या गोळीबारात, गेटवरून उडी मारून जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आणि जालियनवाला बागेच्या मध्यभागी असणाऱ्या विहिरीत पडून आपला जीव गमावला होता.
रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी अमृतसर, पंजाबमधील नागरिक शांतपणे जालियनवाला बागेत जमले असताना जनरल डायर त्याच्या तुकडीसह आला आणि कोणतीही पूर्वसूचना न देता अंदाधुंद गोळीबार सुरु केला. रौलेट कायद्याला होणारा विरोध हे फक्त निमित्त्यमात्र होते. तत्कालीन अनेक घटनांमुळे हा काळा दिवस भारतीय इतिहासात नोंदवला गेला. या हत्याकांडावेळी झालेल्या आणि फारशा उजेडात न आलेल्या घटनांची आज आपण माहिती घेऊ.
१. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी अमृतसरमधील जनता रस्त्यावर उतरली होती. नागरिकांनी सरकारी इमारतींवर हल्लाबोल केला होता. दरम्यान एका ब्रिटिश शिक्षिकेवरती जमावाने केलेल्या हल्ल्याची बातमी पसरली. या घटनेच्या सत्यतेवरून नंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते.
२. आक्रमक झालेला जमाव आणि बंडाच्या वाढत्या घटना बघून पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला आला होता, ज्यानुसार जमावबंदी लागू होत होती. पाचपेक्षा अधिक माणसांना एकत्र येण्यास बंदी होती. अचानक लागू करण्यात आलेली ही जमावबंदी सामान्य लोकांपर्यंत पोहोचली न्हवती त्यामुळे हजारो लोक जालियनवाला परिसरात जमले होते.
३. त्यादिवशी जालियनवाला बागेत मुख्य प्रवेशद्वाराशिवाय कोणताही मार्ग सुरु नव्हता, इतर गेट बंद होते आणि बाजूचा परिसर इमारतींनी वेढलेला होता. यामुळे लोकांना बाहेर पडता आले नाही आणि पुढच्या दुर्दैवी प्रकारात त्यांनी आपला जीव गमावला.
४.. जनरल डायरसोबत असलेल्या ५० गुरखा, बलुचि सैनिकांच्या तुकड्यांकडे सिंड राइफल्स होत्या, शिवाय मशीनगनने सुसज्ज अशा दोन गाड्याही होत्या. नोंदीनुसार इथे बंदुकांचे एकूण १६५० राउंड फायर करण्यात आले. म्हणजे सगळी काडतुसे संपल्यावरच हा गोळीबार थांबला होता. नोंदीनुसार, जमावाला जनरल डायरने गोळीबाराचा आदेश देण्यापूर्वी कोणतेही चेतावणी किंवा विखुरण्याचा आदेश दिला गेला नव्हता. जवळपास सलग दहा मिनिटे हा गोळीबार सुरु होता.
५. कर्नल रेजिनाल्ड डायरच्या कृत्याची माहिती जेंव्हा पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायरपर्यंत पोचली तेंव्हा त्याने Your Action Is Correct या आशयाची तार लिहून त्याच्या कृत्याचे समर्थन केले. १३ मार्च १९४० साली जालियनवाला बाग हत्याकांड प्रत्यक्ष पाहिलेले सरदार उधमसिंग यांनी ओडवायरची गोळ्या घालून हत्या केली. याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
६. जालियावाला बाग हत्याकांडामध्ये जिवंत राहिलेले लोक शेवटपर्यंत या घटनेला विसरू शकले नाहीत. या घटनेतील शेवटचा साक्षीदार शिंगारा सिंग २९ जून २००९ रोजी अमृतसरमध्ये ११३ व्या वर्षी निधन पावले. जालियनवाला बाग दुर्घटनेवेळी त्यांनी आपले वय १९ च्या आसपास होते असे नमूद केले होते.
७. या हत्याकांडाबद्दल हंटर कमिशनने डायरची चौकशी केली तेंव्हा त्यांनी विचारले होते की जखमींना तुम्ही मदत का नाही केली. यावर डायरने it was not my job असे उत्तर दिले. दवाखाने उघडे होते, त्यांनी स्वतः जाऊन उपचार करून घ्यावेत, असे त्याचे मत होते.
८. हंटर कमिशनच्या चौकशीनंतर जनरल डायरला पंजाबचे गव्हर्नरपद सोडावे लागले. पण त्याला या हत्याकांडाबद्दल शिक्षा केली गेली नाही. तो इंग्लडला परतला, त्याला तिकडे पदोन्नतीही मिळाली. त्याच्या कृत्यावरून सगळीकडून टीका होत असतांना काही अधिकारी, वृतपत्रे आणि समूहांनी मात्र त्याला हिरो ठरवले, त्याचा गौरव केला. त्याला सहकार्य म्हणून जनरल डायर फंड सुरु करण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.