India Women's World Cup 2025 Win: भारतीय महिला संघाने 47 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इतिहास रचला. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम (Final) सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 52 धावांनी पराभूत करुन आपले पहिले विश्वविजेतेपद पटकावले. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर भारतीय महिलांनी हा ऐतिहासिक विजय साकारला. प्रवासातील सर्व चढ-उतारांवर मात करत भारतीय संघाने तिसऱ्यांदा विश्वचषकाचा अंतिम सामना गाठला होता. 2005 आणि 2017 मध्ये विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर यंदा मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने कोणतीही कसर सोडली नाही आणि देशाला क्रिकेटमध्ये आणखी एक गौरवशाली क्षण मिळवून दिला.
दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने आश्वासक आणि दमदार खेळी केली होती. 50 षटकांत 7गड्यांच्या मोबदल्यात भारताने 298 धावांचा विशाल आणि आव्हानात्मक डोंगर उभा केला होता. सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी संयम आणि आक्रमकता यांचा योग्य समन्वय साधत धावांचा वेग कायम राखला. प्रत्येक फलंदाजाने छोटेखानी पण महत्त्वाचे योगदान देत संघाला 298च्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले होते.
त्याचवेळी, 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करत कडवी झुंज दिली. त्यांची कर्णधार लॉरा वुल्फर्ट (Laura Wolvaardt) हिने एकहाती लढत देत उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. तिने शानदार 101 धावांची शतकी खेळी साकारली. तिच्या या खेळीमुळेच सामना एका क्षणाला दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) बाजूने झुकतोय की काय, अशी भीती भारतीय चाहत्यांना वाटू लागली होती.
पण, भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने गोलंदाजीची सूत्रे हाती घेत सामन्याला निर्णायक वळण दिले. दीप्तीने अत्यंत मोक्याच्या क्षणी आफ्रिकेच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत पाठवले. तिच्या भेदक आणि अचूक फिरकी गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांचा निभाव लागला नाही. दीप्तीने सामन्यात 4 महत्त्वपूर्ण बळी घेतले, जे भारताच्या विजयात निर्णायक ठरले. तिच्या या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 47.5 षटकांत केवळ 246 धावांवर ऑल आऊट झाला आणि भारताने 52 धावांनी शानदार विजय नोंदवला.
कर्णधार लॉरा वुल्फर्टची अविस्मरणीय शतकी खेळी तिच्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही आणि ती व्यर्थ ठरली. भारतीय महिला संघाने केलेली ही कामगिरी त्यांचा लढाऊ बाणा आणि शेवटपर्यंत हार न मानण्याची वृत्ती या विजयातून स्पष्टपणे दिसून येते. भारतीय महिला क्रिकेटमधील हा क्षण केवळ एक स्पर्धा जिंकण्याचा नाही, तर देशातील तरुण पिढीला प्रेरणा देणारा आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.