Plane Crash In US: अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एक दुर्घटना समोर आली आहे. या घटनेत विमान कोसळल्याने भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाला असुन तिची मुलगी आणि पायलट गंभीर जखमी झाले आहेत. 5 मार्च रोजी हा अपघात झाला असून विमानात 63 वर्षीय रोमा गुप्ता आणि तिची 33 वर्षीय मुलगी रीवा गुप्ता या लहान विमानात होते, अशी माहिती एनबीसी न्यूयॉर्क टीव्ही चॅनेलने दिली आहे.
एनबीसी न्यूयॉर्क टीव्ही चॅनेलच्या वृत्तानुसार, रीवा आणि 23 वर्षीय वैमानिक फैझल चौधरी या अपघातात गंभीररीत्या भाजले असून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'दोन रुग्ण गंभीर जखमींना एका नागरिकाने विमानातून बाहेर काढले होते. तर, या अपघातात रोमाचा मृत्यू झाला,’ असे नॉर्थ लिंडेनहर्स्ट फायर चीफ केनी स्टॅलोन यांनी माहिती दिली आहे. .
दुर्घटनाग्रस्त विमान डॅनी विझमन फ्लाइट स्कूलचे होते. वैमानिकाकडे त्याचे सर्व रेटिंग आणि प्रमाणपत्रे आहेत. या विमानाची (Plane) गेल्याच आठवड्यात दोन सखोल तपासणी करण्यात आली होती, असे या संस्थेचे वकील ओलेह डेकायलो यांनी सांगितले.
स्टोनी ब्रूक हॉस्पिटलमध्ये रीवाला दाखल करण्यात आले आहे. माऊंट सिनाई सिस्टीममध्ये रीवा फिजिशियन असिस्टंट आहे. गुप्ता कुटुंबीयांची मदतीसाठी एक GoFundMe तयार करण्यात आला असून आतापर्यंत 60,000 डॉलर्सहून जास्त निधी उभारला गेला आहे.
लाँग आयलंडवरील रिपब्लिक विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर ते परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला. लाँग आयलँडच्या घरांजवळ विमान कोसळण्यापूर्वी कॉकपिटमधून धूर येत असल्याची माहिती वैमानिकाने दिली होती.
चार आसनी सिंगल इंजिनच्या विमानाने पेट घेतल्यावर ते खाली कोसळले. या अपघातामुळे विमानतळ परिसरातील कोणत्याही घराचे नुकसान झाले नाही. तसेच अन्य जीवितहानी झाली नाही. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड अपघाताच्या कारणांचा शोध घेणार आहे. तर, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन देखील या अपघाताची चौकशी करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.