India Beat Australia By 48 Runs: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (6 नोव्हेंबर) क्वीन्सलँड येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीला फलंदाजीत दमदार कामगिरी केली आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 48 धावांनी नमवले. या विजयासह भारताने मालिकेत 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 167 धावांची समाधानकारक धावसंख्या उभारली होती. सलामीवीर अभिषेक शर्मा याने 21 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 1 षटकारासह 28 धावांची खेळी खेळली. तर शुभमन गिलने 39 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 46 धावांची खेळी खेळली. तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या शिवम दुबेने 18 चेंडूंमध्ये 22 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच, सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून 10 चेंडूंमध्ये 20 धावा आल्या. भारतीय फलंदाजांनी सातत्याने धावा जोडल्यामुळे संघाला 167 पर्यंत पोहोचता आले.
त्याचवेळी, 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्णपणे ढेपाळला. भारताच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 18.2 षटकांत केवळ 119 धावांवर ऑलआऊट झाला. सलामीवीर मिचेल मार्श याने 24 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या, तर मॅथ्यू शॉर्टने 19 चेंडूंमध्ये 25 धावांची खेळी खेळली. मात्र, त्यानंतर जोश इंग्लिस (12), टिम डेव्हिड (14) आणि जोश फ्लिप (10) यांसारख्या खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील खेळाडूंनी निराशा केली.
भारताच्या विजयात गोलंदाजांनी सिंहाचा वाटा उचलला. जवळजवळ सर्वच गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बांधून ठेवले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 बळी घेतले. सुंदरला शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनी चांगली साथ दिली. या दोघांनीही प्रत्येकी 2-2 बळी घेतले. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 1-1 बळी घेतले. या विजयामुळे भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेऊन ऑस्ट्रेलियावर दबाव वाढवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.