

Womens World Cup 2025: नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात महिला वनडे वर्ल्ड कप 2025 चा दुसरा सेमीफायनल सामना खेळला जात आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाची कर्णधार आणि आक्रमक फलंदाज एलिसा हीलीला (Alyssa Healy) लवकर बाद करण्याची मोठी संधी मिळाली होती, मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) एका सोप्या चुकीमुळे हीलीला जीवदान मिळाले.
दरम्यान, हा प्रकार ऑस्ट्रेलियाच्या डावातील तिसऱ्या षटकात घडला. भारताकडून वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर गोलंदाजी करत होती. तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीलीने मिड-ऑफच्या वरुन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हा शॉट मारताना हीलीची बॅट फिरली आणि चेंडू हवेत उंच गेला. यावेळी 30 यार्ड सर्कलमध्ये मिड-ऑफवर उपस्थित असलेल्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरकडे तो अत्यंत सोपा झेल (Easy Catch) पकडण्याची सुवर्णसंधी होती. परंतु, हरमनप्रीतच्या हातून हा झेल निसटला. ज्यावेळी हा झेल सुटला, त्यावेळी एलिसा हीली फक्त 3 धावा काढून फलंदाजी करत होती.
हा झेल सोडल्यानंतर भारतीय महिला संघाच्या खराब क्षेत्ररक्षणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत तब्बल 17 झेल सोडले आहेत. या आकडेवारीनुसार, भारतीय संघ आठ संघांमध्ये झेल सोडण्याच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर आहे, तर त्यांचा कॅच पकडण्याचा सरासरी दर केवळ 65.3% इतका आहे.
सुदैवाने, हरमनप्रीतने दिलेल्या या जीवदानाचा एलिसा हीली फारसा फायदा उचलू शकली नाही. मिळालेल्या संधीनंतरही ती फक्त 15 चेंडूत 5 धावा काढून बाद झाली. भारतीय फिरकी गोलंदाज क्रांती गौडने हीलीला त्रिफळाचीत (Bold) केले. विशेष म्हणजे, वनडे क्रिकेटमध्ये क्रांती गौडने पाच डावांमध्ये चौथ्यांदा हीलीला बाद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.