Cheteshwar Pujara Criticized Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात 14 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे झाली. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या दोन दिवसांपर्यंत सामन्यावर आपला दबदबा कायम ठेवला, पण तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजी ढेपाळली. भारताला विजयासाठी मिळालेले अवघे 124 धावांचे लक्ष्य देखील गाठता आले नाही आणि टीम इंडिया अवघ्या 93 धावांवर गारद झाली.
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 30 धावांनी पराभव केला आणि भारतीय भूमीवर तब्बल 15 वर्षांनंतर कसोटी सामना जिंकण्याचा मोठा पराक्रम केला. टीम इंडियाच्या या पराभवाने भारतीय क्रिकेट चाहते कमालीचे निराश झाले आहेत.
टीम इंडियाच्या (Team India) या अनपेक्षित पराभवानंतर संघाचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने भारतीय फलंदाजांना चांगलेच फैलावर घेतले. पुजाराने या पराभवासाठी फक्त फलंदाजांना जबाबदार धरले नसले तरी, पहिल्या दिवसापासूनच असामान्य उसळी आणि टर्न असलेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांच्या दृष्टिकोनावर त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पुजाराने स्पष्ट केले की, ''भारतीय कसोटी क्रिकेट सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे, यात शंका नाही, पण घरच्या मैदानावरील कसोटी सामना गमावण्याचे हे कारण असू शकत नाही आणि तो हा बहाणा म्हणून मान्यच करु शकत नाही.''
कोलकाता येथे भारताच्या 30 धावांनी झालेल्या पराभवानंतर पुजाराने 'जिओस्टार' वर बोलताना आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, "भारत जर बदलांमुळे घरच्या मैदानावर हरत असेल, तर मला हे अजिबात आवडलेले नाही."
पुजाराने पुढे सांगितले की, "जर तुम्ही इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये बदलांमुळे हरलात, तर ते कदाचित स्वीकारार्ह असू शकते. पण, या टीममध्ये प्रचंड प्रतिभा आणि क्षमता आहे. जर तुम्ही या खेळाडूंचे प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील रेकॉर्ड बघितल्यास कोणतीही शंका उपस्थित करणार नाही. या सर्व खेळाडूंचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. तरीही जर टीम इंडिया घरच्या मैदानावर हरत असेल, तर याचा अर्थ काहीतरी गडबड आहे."
पुजाराने भारताच्या (India) प्रतिभेचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, "भारतात इतकी प्रतिभा आहे की भारताची 'ए' टीम देखील दक्षिण आफ्रिकेला हरवू शकते. त्यामुळे जर तुम्ही म्हणत असाल की, 'हा पराभव बदलांमुळे झाला आहे, तर हे अजिबात स्वीकारार्ह नाही."
भारतीय फलंदाजांच्या नकारात्मक दृष्टिकोनावर पुजाराने थेट टीका केली असून संघाच्या कामगिरीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.