अहमदाबाद: ट्वेन्टी-२० प्रकारातील आशिया करंडक स्पर्धेवर वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेवरही प्रभूत्व गाजवण्यास सज्ज झाला आहे. दोन कसोटी सामन्यांची ही मालिका गुरुवारपासून सुरू होत आहे.
प्रशिक्षक गौतम गंभीरसह कर्णधार शुभमन गिल आणि काही खेळाडू दुबईहून सोमवारीच अहमदाबादमध्ये दाखल झाले आणि क्षणाचाही विलंब अथवा विश्रांती न घेता लगेचच कसोटी क्रिकेटच्या मोडमध्ये बदल केला आहे.
पावसाची शक्यता आणि हिरवी खेळपट्टी
एरवी अहमदाबादमधील खेळपट्टीची परंपरा फिरकीस साथ देणारी असते; परंतु या वेळी वातावरण बदलामुळे खेळपट्टीवर हिरवे गवत आहे. परतीचा पाऊस असल्यामुळे हवेत दमटपणा अधिक आहे. पुढील पाच दिवस पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे; परंतु पावसामुळे मोठ्या प्रमाणात खेळ वाया जाण्याची शक्यता कमी आहे.
गेल्या मोसमात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली प्रगती करीत असताना न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारण्याची वेळ आली होती. फिरकी खेळपट्ट्यांच्या सापळ्यात भारतीय फलंदाजच अडकले होते. त्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडीजविरुद्धच्या या मालिकेत खेळपट्टीवर हिरवे गवत ठेवण्यात आले आहे.
तसेच भारताकडे जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज असा वेगवान मारा या संधीचा फायदा घेण्यास समर्थ आहे. तिसरा वेगवान गोलंदाज खेळवण्याचा विचार निश्चितच केला जाणार आहे आणि त्यासाठी प्रसिध कृष्णाला प्राधान्य मिळेल; परंतु त्याच वेळी नितीशकुमार रेड्डी हा अष्टपैलू खेळाडू वेगवान माऱ्यासाठी आणखी एक पर्याय आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महत्त्वाची मालिका
इंग्लंडमधील मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवण्याचा पराक्रम आता कसोटी अजिंक्यपद मालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. या स्थानात प्रगती करण्यासाठी वेस्ट इंडीजविरुद्धची ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मोसमात भारतीय संघ मायदेशात चार कसोटी सामने खेळणार आहे. त्यातून जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
करुण नायरला वगळण्यात आल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन फलंदाजी करणार हे निश्चित आहे. देवदत्त पडिक्कल मधल्या फळीत खेळेल. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल हे सलामीवीर पुन्हा एकदा ठसा उमटवण्यास सज्ज आहेत. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने ४१२ धावांचे आव्हान पार केले होते त्यात राहुलने नाबाद १७६ धावांची खेळी साकार केली होती.
सामन्याची वेळ
सकाळी ९.३० पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.