Baji Pasalkar History Dainik Gomantak
देश

Baji Pasalkar: स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या 16 वर्षीय शिवरायांसाठी 65 वर्षाच्या वीर 'बाजी पासलकर' यांनी दिली होती पहिली आहुती

Baji Pasalkar History: मावळ खोऱ्यात देशमुख मंडळी वतनदारी सांभाळत होती. महाराजांच्या भेटीगाठीमधून काही मंडळी स्वराज्याच्या कार्यात सामील झाली. यातील एक महत्वाचे नाव म्हणजे बाजी पासलकर.

Sameer Panditrao

आबासाहेब शहाजीराजेंच्या बंगळूरु भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजापूर दौरा झाला. या दौऱ्यात महाराजांनी बादशाही पाहिली. पारतंत्र्य, स्वकीयांचे हाल, अन्याय, अत्याचार जवळून पाहिले. बादशाहाच्या चाकरीत वडिलांची होत असलेली कुचंबणा त्यांच्या लक्षात आली. या दौऱ्यात प्रजेच्या हक्काच्या राज्याची जाणीव त्यांच्या मनात दृढ होत चालली.

शहाजीराजांना शिवाजी महाराजांच्या मनात काय चालले आहे ते कळले. त्यांनी महाराजांना पुण्याला परत पाठवताना आपले निवडक साथीदार सोबत दिले.

महाराज पुण्यात परतले. लाल महाल गजबजला. महाराज आपल्या सवंगड्यांसोबत सगळा मावळ पालथा घालू लागले. महत्वाच्या लोकांच्या भेटीगाठी घेऊ लागले. त्यांच्या मनात एकाच वादळ घोंगावत होते, लोकांचे राज्य, आपले राज्य.. स्वराज्य.

मावळ खोऱ्यात देशमुख मंडळी वतनदारी सांभाळत होती. महाराजांच्या भेटीगाठीमधून काही मंडळी स्वराज्याच्या कार्यात सामील झाली. यातील एक महत्वाचे नाव म्हणजे बाजी पासलकर. ते 'पौड'जवळच्या 'तव' गावात रहात होते. अख्ख्या मोसे खोऱ्यात बाजींसारखा शूर, दिलदार माणूस दुसरा न्हवता. बाजींना यशवंतराव असा पिढीजात किताब होता. खोऱ्यातील मंडळींना मदत करण्यात ते नेहमी पुढे असत.

बाजी पासलकर छत्रपती शिवरायांच्या संपर्कात आले आणि ते कायमचे त्यांचेच झाले. बाजींच्या सहकार्याने अनेक देशमुख स्वराज्याच्या कार्यात सहभागी होऊ लागले. मावळ स्वराज्याचे स्वप्न पाहू लागले.

महाराजांनी स्वराज्याची मोट बांधायला सुरू केली होती. बाजी जेधे, तानाजी - सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, चिमणाजी- बाळाजी देशपांडे, नरसप्रभू गुप्ते असे अनेक सवंगडी जमा झाले. नुकतेच मिसरूड फुटलेल्या या सवंगड्यांमध्ये या सगळ्यांच्या वयाच्या दुपटीहून मोठे असलेले, पासष्टीच्या जवळपास आलेले, पांढऱ्या मिशांना पीळ भरणारे बाजी पासलकर अगदी सहज रमले.

मुहूर्त ठरला. स्वराज्याचं तोरण बांधायला शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सेना जमली आणि इतिहास घडला. हर हर महादेवची गर्जना झाली आणि मावळ्यांनी, स्वराज्याच्या शिलेदारांनी रणशिंग फुंकले. कानद खोऱ्यातील उंच तोरणा जिंकला.

मग बाण सुटला. मुरुंबदेवाचा डोंगर (राजगड ), कुवारीगड आणि भवतालचा बराचसा मुलुख स्वराज्यात सामील झाला. सोबत महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या सतराव्या वर्षी धोरणी राजकारण खेळून जावळीच्या नव्या चंद्ररावाला गादीवर बसण्यास सहकार्य केले. रक्ताचा थेंबही न सांडता कोंढाणा जिंकला आणि शिरवळच्या ठाण्यावर छापा टाकून किल्ले सुभानमंगळही ताब्यात घेतला.

या सगळ्याचा परिणाम होऊन बादशाह खवळला. त्याच्या आदेशाने मुस्तफाखानने शहाजीराजांना कैद केले. इकडे फत्तेखान नुकत्याच उभ्या ठाकलेल्या स्वराज्याच्या दिशेने वेगाने निघाला. राजगडावर मावळ्यांनी कंबर कसली, बाजी पासलकरांनी मुठी आवळल्या. फत्तेखानाशी पुरंदरवरून लढा द्यायचे ठरले.

Shivaji Maharaj statue

पुरंदरचे गडकरी महादजीराव सरनाईकांनी होकार दिला आणि लढाईचे रणशिंग फुंकले. कावजीच्या हाताखाली तुकडी देण्यात आली. भयंकर पराक्रम गाजवून मराठ्यांनी फत्तेखानाच्या सैनिकांनी काबीज केलेला सुभानमंगळ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. हजारपट उत्साहाने गेलेले वीर मोहीम फत्ते करून लाखपट उत्साहाने परत आले.

फत्तेखानाचे संकट अजूनही घोंगावत होतेच. मावळ्यांनी खानाच्या छावणीवर जोरदार हल्ला चढवला. तुंबळ युद्ध झाले. खानाचे अनेक सरदार मारले गेले. त्याला सुचायचे बंद झाले. पराक्रमी सरदारांनी भरलेल्या फौजेला नुकतेच मिसरूड फुटलेल्या मावळ्यांनी धडा शिकवला होता.

खान चवताळला आणि पुरंदरवर चाल करून गेला. दऱ्याखोऱ्यात चढाईची सवय नसलेले त्याचे सरदार आधीच दमून गेले. इशारा झाला. मावळ्यांनी दगडांचा मारा सुरू केला. खानाच्या फौजेला हा अनपेक्षित हल्ला पेलवलाच नाही. स्वराज्याच्या स्वप्नाकडे घोडदौड करणाऱ्या मावळ्यांनी गडाचे दरवाजे उघडून बेफाम हल्ला चढवला. प्रचंड कापाकाप झाली. खानाचा धीर तुटला आणि तो सैन्यासह पळून जाऊ लागला.

खानाचा जंगी पराभव झाला. पळणाऱ्या सेनेला पाहून बाजी पासलकर, कावजी मल्हार धावत्या शत्रूच्या मागे लागले. त्यांनी फत्तेखानाच्या फौजेला सळो की पळो करुन सोडले. ही झटापट सासवडपर्यंत गेली. आणि इतक्यात... इतक्यात घात झाला.

गनिमाचा वार बाजींच्या वर्मी बसला. बाजी पासलकर ठार झाले. ही दुःखद बातमी महाराजांपर्यंत पोहोचवण्यात आली. महाराज शोकाकुल झाले. स्वराज्यासाठी झटणाऱ्या शूरांसोबत उभा राहिलेला हा आधारवड कोसळला. महाराष्ट्रधर्मासाठी पहिल्या वीराने प्राणांची आहुती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Devendra Fadnavis In Goa: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'डिजिटल लोकशाही संवाद' कार्यक्रमासाठी गोव्यात दाखल

Rama Kankonkar Assault: 'त्या मंत्र्याचे नाव जाहीर करा, कोड्यात काय बोलता...' रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात सुदिन यांचं प्रतिआव्हान

USA Cricket Board Suspended: पाकिस्तानची दाणादाण उडवणाऱ्या अमेरिका संघाला ICC चा दणका, सदस्यत्व केलं निलंबित; 'हे' ठरलं कारण

IND vs AUS: 14 वर्षांचा पोरगा बनला षटकारांचा नवा बादशाह! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; तूफानी खेळीनं उडवली कांगांरुची झोप VIDEO

Goa Rain: काळजी घ्या! पाऊस पुन्हा गोव्यात, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट', 6 दिवस जोरदार कोसळणार

SCROLL FOR NEXT