
सर्वेश बोरकर
छत्रपती शिवाजी महाराजांचा फेब्रुवारी १६८०मध्ये स्वर्गवासा जाहला. गुजरातमधील पश्चिम किनाऱ्यावरील वलसाडपासून सुरू होऊन पूर्व किनाऱ्यावरील चेन्नईच्या पुढे असलेल्या जिंजी किल्ल्यापलीकडे १६०० किमी लांबीचे महाराजांचे राज्य पसरले होते. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते. त्यांच्यापैकी काही लोक समुद्रकिनाऱ्यांवर असणाऱ्या गावांची लूटमार करत, तेथील लोकांचा छळ करत.
शिवरायांनी या सागरी शत्रूचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले. शिवरायांनी लहान-मोठी जहाजे-नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग त्यांनी दुरुस्त केले. शिवरायांनी मालवणजवळ कुरटे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. तसेच मुंबईजवळ खांदेरीचा किल्ला बांधला.स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, आगरी यांसारख्या विविध दर्यावर्दी जाती-धर्माचे सैनिक होते.
दौलतखान, मायनाक भंडारी, लाय पाटील, दर्यासारंग, तुकोजी आंग्रे यांसारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळात प्रसिद्धीस आले. मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आणि डच अशा सागरावरील शत्रूंना त्यांचा दरारा वाटू लागला.
त्यामुळे शत्रूंचा स्वराज्याला होणारा त्रास कमी झाला. शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द किनारपट्टीलगतच्या भागावर निश्चित करून स्वामित्व प्रस्थापित केले व आपला समुद्रकिनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार.
शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्तहेर खाते होते. बहिर्जी नाईक त्यांच्या हेर खात्याचा प्रमुख होता. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडान्खडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईचा बेत आखत.
छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रत्नपारखी राजे जगात झाले नाहीत. वरवर अत्यंत सामान्य वाटणाऱ्या माणसांतले गुण हेरून महाराजांनी त्यांच्यातून स्वराज्यासाठी रत्ने मिळवली असेच एक रत्न जडजवाहीर म्हणजे सरलष्कर सिधोजीराजे नाईक निंबाळकर.
शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यामुळे हडबडलेल्या विजापुरी सल्तनतीने राजांवर बहलोलखानसारखा खासा पठाण पाठवला होता परंतु बहीर्जींच्या खबरी मंडळींनी ही बातमी वाऱ्याच्या वेगाने महाराजांपाशी पोहोचवली. आणि त्यांच्या बंदोबस्तालाच प्रतापरावांसोबत १५ हजार फौजफाटा पाठवून आपल्या परीने योजना आखून बहलोलखानास जेरीस आणावे ही शिवरायांची ताकीदच होती.
अचानक कोसळलेल्या संकटामुळे बहलोलखानाची फौज थोडी घाबरली. परंतु लगेचच त्यांनी लढाईची सिद्धता दाखविली. लवकरच दोन्हीकडचे घोडदळ पायदळ एकमेकांवर आदळू लागले. एकच कापाकापी सुरू झाली. सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ व आनंदराव असे मराठी रियासतीचे अनुभवी सरदार अंगावर येणाऱ्या प्रत्येक गनिमास आपल्या तलवारीचे पाणी पाजत होते.
रुपाजी भोसले, सोमाजी मोहिते, सिधोजी निंबाळकर हेदेखील तिखट हत्यार चालवीत होते. पुढच्या फळीत लढणारे सिधोजी निबांळकर मोठ्या त्वेषाने दुश्मनावर तुटून पडत होते. समोर येणाऱ्यांची खैर नव्हती. बहलोलखानाने आपल्या भोवती झालेली कोंडी फोडण्यासाठी त्याच्या फौजेत असणाऱ्या मदमस्त हत्तींना पुढे केले.
हे गजराज मदोन्मत्त होऊन अनेक मराठ्यांना आपल्या पायदळी तुडवत होते. आकांत माजवत होते. अशा पिसाळलेल्या जनावरास सिधोजींनी माहुताकरवी जेरीस आणले. सायंकाळी सिधोजी निंबाळकरांनी तो हत्ती हस्तगत केला आणि महाराजांकडे चालविला. याच हत्तीच्या तोडीच्या कामामुळे खूश होऊन राजेंनी सिधोजींना सैन्यात बढती दिली.
साधनांच्या अभावी जास्त माहिती मिळत नाही, पण बेहलोलखानानंतर सिधोजींचा उल्लेख येतो तो जालानापुरीच्या लुटीत. राजांच्या आयुष्यातील शेवटची स्वारी म्हणजे जालन्याची स्वारी. ४ दिवस राजेंनी पेठा मारल्या. जडजवाहीर, कापड, घोडे, हत्ती, उंट जप्त केले. जालना म्हणजे मोगलाईतील महत्त्वाचे शहर. ते मारिल्यामुळे मोगल संतप्त जाहले. मोगली फौज घेऊन रणमस्त खान चालून आला. त्याची गाठ महाराजांच्या सैन्याच्या मागच्या तुकडीशी संगमनेरजवळ पडली. महाराजांच्या लष्करातील संताजी घोरपडे आणि पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर.
नोव्हेंबर १६७९मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लष्करी मोहीम विनाशकारी ठरली असती जी यशस्वी ठरली त्यांच्या सिधोजी निंबाळकरच्या बलिदानामुळे. १६७७-१६७८मध्ये दक्षिण भारत जिंकण्यासाठी मोठी रक्कम खर्च केल्यानंतर त्यांच्या साम्राज्याच्या विकासासाठी निधीची कमतरता होती. शिवाजी महाराजांनी आपला खजिना भरण्यासाठी औरंगाबादजवळील जालन्याच्या मुघल प्रदेशात स्वारी करण्याचा निर्णय घेतला.
स्वारीत भरलेले ४,००० घोडे आणि १५,००० सैन्य घेऊन जालन्याहून परत येत असताना रणमस्त खान नावाचा एक धाडसी मुघल अधिकारी शिवाजी महाराजांच्या मागे लागला. गती आणि ताकद दोन्हींना ओझ्याने दबलेल्या घोड्यांमुळे अडथळा येत होता. सरदार खान आणि केसरी सिंह नावाच्या राजपूत सेनापतीच्या नेतृत्वाखाली आणखी एक मुघल सैन्य शिवाजीचा पाठलाग करू लागले. एका रात्री जेव्हा हे मुघल शिवाजीच्या सैन्यापासून काही मैल मागे होते, तेव्हा महाराजांचे हितचिंतक केसरी सिंह यांनी त्यांना रात्रीच्या वेळी एका गुप्त संदेशाद्वारे कळवले की महाराजांनी ताबडतोब पुढे जाण्यास सुरुवात करावी अन्यथा दुसऱ्या दिवशी सकाळी मुघल त्यांना घेरतील.
छत्रपती शिवाजींनी त्यांचे विश्वासू सरदार सिधोजी निंबाळकर यांच्याकडे ५,००० सैन्यासह मुघलांना रोखण्याचे काम सोपवले. अखेर कडवट प्रतिकार देत सिधोजींनी आपल्या ५ हजार सैन्यानिशी चांदोर पर्वतरांगांच्या (औरंगाबाद आणि नाशिक दरम्यान) डोंगराळ भागात तीन दिवस रणमस्तखानास व मुघलांना रोखून ठेवले. परंतु शेवटी त्यांच्या बहुतेक सैनिकांसह अखेर याच युद्धभूमीत सिधोजी निंबाळकर यांस वीरमरण आले.
परंतु तोपर्यंत शिवाजी महाराज बहिर्जी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पट्टागड नावाच्या त्यांच्या प्रदेशातील किल्ल्यावर पोहोचले होते. येथे त्यांनी एक महिना विश्रांती घेतली आणि त्या संस्मरणीय घटनेवरून किल्ल्याचे नाव ’विश्रामगड’ ठेवले. छत्रपतींच्या आयुष्यातील ही शेवटची लष्करी मोहीम होती. कारण, त्यांनी ४ फेब्रुवारी १६८० रोजी जगाचा निरोप घेतला व सिधोजी निंबाळकर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपले प्राण अर्पण करणारे शेवटचे योद्धा ठरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.