नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि विविध माध्यमांमध्ये अंड्यांमध्ये कर्करोगजन्य घटक आढळल्याच्या बातम्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) शनिवारी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. देशातील बाजारपेठेत मिळणारी अंडी मानवी सेवनासाठी पूर्णपणे सुरक्षित असून, दूषित अंड्यांचे दावे हे दिशाभूल करणारे आणि विनाकारण भीती पसरवणारे असल्याचे स्पष्ट केले आहे.
FSSAI ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, अंड्यांमध्ये 'नायट्रोफुरन मेटाबोलाइट्स' (AOZ) नावाचे घटक असल्याचा जो दावा केला जात आहे, त्याला कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नाही. अशा प्रकारच्या बातम्यांमुळे विनाकारण सार्वजनिक गोंधळ निर्माण होत आहे. प्राधिकरणाने स्पष्ट केले की, 'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स रेग्युलेशन २०११' नुसार कुक्कुटपालन आणि अंडी उत्पादनाच्या कोणत्याही टप्प्यावर नायट्रोफुरनचा वापर करण्यास कठोर बंदी आहे. त्यामुळे व्यावसायिक स्तरावर याचा वापर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
अंड्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी १.० मायक्रोग्राम प्रति किलो इतकी मर्यादा (EMRL) निश्चित करण्यात आली आहे. ही मर्यादा केवळ प्रयोगशाळेतील तपासणीसाठी असून, याचा अर्थ असा नाही की या पदार्थांच्या वापराला परवानगी आहे. जर एखाद्या अंड्यात या मर्यादेपेक्षा कमी प्रमाणात अंश आढळले, तर त्याला नियमांचे उल्लंघन मानले जाऊ शकत नाही आणि त्यातून मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. भारताची ही नियमावली युरोपियन युनियन आणि अमेरिकेच्या मानकांशी सुसंगत आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे, नायट्रोफुरनच्या अत्यल्प अंशांमुळे कर्करोग होतो, असा कोणताही पुरावा जागतिक स्तरावर उपलब्ध नाही. कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेने अंडी खाण्याचा संबंध कर्करोगाशी जोडलेला नाही. एखाद्या विशिष्ट ब्रँडच्या अंड्यांमध्ये दोष आढळल्यास ती एक सुटी घटना असू शकते, जी खाद्य किंवा इतर स्थानिक कारणांमुळे घडते. संपूर्ण देशातील अंडी पुरवठा साखळीवर त्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे.
अंडी हा प्रथिनांचा एक स्वस्त आणि पौष्टिक स्रोत आहे. त्यामुळे अधिकृत माहिती आणि वैज्ञानिक पुराव्यांवरच ग्राहकांनी विश्वास ठेवावा, असे आवाहन FSSAI ने केले आहे. संतुलित आहारात अंडी सुरक्षित आणि अत्यंत महत्त्वाची असून, घाबरून जाऊन त्यांचे सेवन बंद करू नये, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.