Delhi Police Meme Stunt: रस्त्यावरील भीषण अपघात, गंभीर दुखापती आणि मृत्यूच्या अनेक बातम्या दररोज समोर येत असूनही अनेक तरुणांची स्टंटबाजीची काही नशा उतरताना दिसत नाही. केवळ सोशल मीडियावर 'लाईक्स' मिळवण्यासाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या 'रीलवीरांना' धडा शिकवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आता एक अनोखा आणि उपरोधिक मार्ग निवडला. दिल्ली पोलिसांनी अशाच एका स्टंटबाज टोळीचा व्हिडिओ वापरुन एक 'मीम' तयार केले आहे, जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी तरुणांना एक कडक इशारा दिला आहे की, काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी आयुष्यभराचे अपंगत्व ओढवून घेऊ नका. दिल्ली पोलिसांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अत्यंत मार्मिक कॅप्शन दिले. या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला 'This Is The End' हे गाणे लावले आहे, जे नेमकं त्या क्षणी वाजतं जेव्हा स्टंटबाज रस्त्यावर कोसळतात.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण आपली दुचाकी रस्त्याच्या मधोमध 'व्हीली' (पुढचे चाक हवेत उचलून चालवणे) करताना दिसत आहे. त्याच्या दुचाकीवर मागे एक मुलगी देखील बसलेली आहे. स्टंट करण्याच्या नादात त्या मुलाचा दुचाकीवरील ताबा सुटतो आणि ती वेगात उलटते. दुचाकी पडल्यामुळे तो मुलगा आणि मागे बसलेली मुलगी दोघेही रस्त्यावर जोरात आपटतात. भयंकर बाब म्हणजे, त्यांच्याच शेजारी दुसरी एक दुचाकी चालत होती, ज्यावर दोन-तीन तरुण होते. या स्टंटबाज मुलाची बाईक घसरुन थेट शेजारच्या दुचाकीला धडकते, ज्यामुळे त्या गाडीवरील लोकही रस्त्यावर आपटतात. एका रीलच्या नादात पाच ते सहा लोकांचा जीव धोक्यात आल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.
दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) पोस्ट केलेल्या या मीमवर युजर्सनी मजेशीर आणि संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने उपरोधाने विचारले की, "सर, या रीलवीरांच्या नेमक्या किती हाडं मोडली आहेत, याची माहिती सुद्धा देऊन टाका." दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "मला खात्री आहे की हे लोक आता आयुष्यात कधीच दुचाकीला हात लावणार नाहीत आणि रील बनवणं तर लांबच राहिलं."
दिल्ली पोलिसांचा हा प्रयत्न केवळ मनोरंजनासाठी नसून रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी आहे. पोलिसांनी वारंवार आवाहन केले आहे की, सार्वजनिक रस्त्यांवर स्टंटबाजी करणे हा गुन्हा आहे आणि यामुळे निष्पाप लोकांचा बळी जाऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.