Covaxin Side Effect: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या महासत्ता (अमेरिका) हादरली आहे. मागील काही दिवसांपासून नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा अवघ्या जगाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण भारतात देखील आढळून येऊ लागले आहेत. दरम्यान, कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक लसी निर्माण करण्यात आल्या. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी त्यापैकीच होत्या. गेल्या काही दिवसांत कोविशील्ड लसीबाबत अनेक रिपोर्ट आले, ज्यामध्ये त्याच्या साइड इफेक्टबद्दल चर्चा करण्यात आली. देशात मोठ्याप्रमाणात लोकांनी कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लस घेतली आहे. पण, आता हळूहळू या दोन्ही लसींचे दुष्परिणाम समोर येत आहेत.
Covishield विकसित करणाऱ्या AstraZeneca या ब्रिटीश कंपनीने नुकतेच तेथील न्यायालयात कबूल केले की, ‘कोविशील्ड लसीमुळे गंभीर आजाराचा धोका उद्भवू शकतो.’ त्याचप्रमाणे आपल्या देशात (India) भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या 'कोव्हॅक्सिन' या लसीच्या दुष्परिणामांबाबत एक रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ही लस घेतल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर त्याचे दुष्परिणाम लोकांमध्ये दिसून आले. याचा सर्वाधिक फटका किशोरवयीन मुलींना बसला. काही दुष्परिणाम खूप गंभीर होते.
‘इकॉनॉमिक टाईम्स’ च्या वृत्तानुसार, या लसीच्या दुष्परिणामांवर ‘ऑब्जर्वेशनल स्टडी’ करण्यात आला. लसीकरण झालेल्या एक तृतीयांश लोकांमध्ये 'एडवर्स इवेंट्स ऑफ स्पेशल इंट्रेस्ट' म्हणजेच AESI आढळून आले. हा रिपोर्ट स्प्रिंगरलिंक (SpringerLink) जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
बनारस हिंदू विद्यापीठाच्या सांखा शुभ्रा चक्रवर्ती आणि त्यांच्या टीमने हा अभ्यास केला आहे. रिपोर्टनुसार, लसीकरण झालेल्या बहुतेक लोकांमध्ये एक वर्षात दुष्परिणाम दिसून आले. या अभ्यासात 1024 लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 635 किशोरवयीन मुले आणि 391 तरुण होते. या सर्वांना लसीकरणानंतर एक वर्षानंतर फॉलो-अप तपासणीसाठी संपर्क करण्यात आला होता.
अभ्यासात, ‘व्हायरल अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन’ 304 किशोरवयीन मुलांमध्ये आढळून आले. 124 म्हणजेच 42.6 टक्के तरुणांमध्येही हा विकार दिसून आला. याशिवाय, 10.5 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये 'न्यू-ऑनसेट स्कीन एंड सबकुटॅनियस डिसऑर्डर' आढळून आला. 10.2 टक्के लोकांमध्ये सामान्य समस्या, 4.7 टक्के लोकांमध्ये मज्जासंस्थेचा विकार म्हणजेच मज्जातंतूशी संबंधित समस्या आढळून आल्या. त्याचप्रमाणे, 8.9 टक्के तरुणांमध्ये सामान्य समस्या, 5.8 टक्के लोकांमध्ये स्नायू, मज्जातंतू, सांधे यांच्याशी संबंधित समस्या दिसून आल्या.
रिपोर्टनुसार, Covaxin चे दुष्परिणाम महिलांमध्येही दिसून आले. 4.6 टक्के महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या, 2.7 टक्के महिलांमध्ये डोळ्यांसंबंधी समस्या दिसून आल्या. तर 0.6 टक्के महिलांमध्ये हायपोथायरॉईडीझमची समस्या दिसून आली.
दरम्यान, गंभीर दुष्परिणाम सुमारे एक टक्के लोकांमध्ये दिसून आले. स्ट्रोकची समस्या 0.3 टक्के (म्हणजे 300 पैकी एक व्यक्ती) आणि 0.1 टक्के लोकांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम आढळून आला. अभ्यासात असे म्हटले आहे की, ही लस घेतल्यानंतर तरुण आणि किशोरवयीन महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्येत लक्षणीय वाढ दिसून आली. अनेक किशोरवयीन मुलींमध्ये थायरॉईडची पातळी अनेक पटींनी वाढली आहे.
चिंतेची बाब म्हणजे लस घेतल्यानंतर वर्षभरानंतर जेव्हा या लोकांशी संपर्क साधला गेला तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेकांमध्ये हे आजार आढळून आले. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, कोव्हॅक्सिनच्या दुष्परिणामांचा पटर्न इतर कोरोना लसींच्या दुष्परिणामांच्या पॅटर्नपेक्षा वेगळा आहे. अशा परिस्थितीत, लसीचा परिणाम सखोलपणे समजून घेण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.