'कॉक्रोच जनता पार्टी’च्या कल्पनेत मनोरंजनाचा आणि ट्रेंडनुसार वाहण्याचा घटक अधिक दिसतो. 'नॅरेटिव'च्या युद्धातून तावून सुलाखून बाहेर पडल्यानंतरच ‘कॉक्रोच पार्टी’चे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागेल.
एरवी झटकण्यापलीकडे विचारात न घेतलेल्या झुरळाला भारतीय न्यायव्यवस्था आणि राजकारणाने केंद्रस्थानी आणून ठेवले आहे. सर्वसामान्य घरातील तरुणाईला आशेचा किरण जणू झुरळातच दिसत आहे, असे चित्र समाजमाध्यमांतून उभे राहात आहे. चार दिवसांपूर्वी जेव्हा ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाचे कृत्रिम प्रज्ञेनिशी तयार केलेले 'पोस्टर' इंटरनेटवर झळकले, तेव्हापासून महाजालावरल्या 'टेक्टॉनिक प्लेट' हलल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतही खळबळ उडाली.. झुरळासारख्या कीटकरूपातील 'उपहासगर्भ पक्षस्थापने'त क्रांतीची बीजे शोधू पाहण्याइतके आपले समाजमन का खालावले आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे.
वास्तविक ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाचा पक्ष नोंदणीकृत नाही किंवा त्याचे पदाधिकारी, घटना, बैठका, विचारसरणी, कार्यक्रम असले काहीही नाही. बोस्टनमध्ये कॉम्प्युटरसमोर बसून अभिजित दिपकेनामक मराठी तरुणाने ‘एआय’च्या मदतीने तासभरात 'कॉक्रोच जनता पार्टी'ची महाजालावर स्थापना केली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका याचिकेवर टिप्पणी करताना काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली, तिथून जाळ पेटला.
सरन्यायाधीशांनी बोगस पदवीवाल्यांबद्दल ते विधान होते, असा खुलासा केल्यानंतरही जाळाचे रुपांतर वणव्यात झाले. त्यांनीच उल्लेखिलेल्या 'कॉक्रोच' ऊर्फ झुरळांच्या पक्षाची अभिजितने प्रतीकात्मक स्थापना करुन टाकली. चार दिवसात कोट्यवधी अनुयायी मिळाले. सेलेब्रिटींपासून बेरोजगारांपर्यंत अनेकांनी समाजमाध्यमांवर या पक्षाला घरबसल्या पाठिंबा देऊन टाकला. हे सारे घडले ते इंटरनेटच्या महाजालात. प्रत्यक्षात झुरळदेखील इकडून तिकडे गेलेले नाही.
हा चार दिवस चालणारा समाजमाध्यमांवरचा ट्रेंड असावा का? की सत्ताधाऱ्यांच्या पायतळीची वाळू सरकावी, असा हा तरुणाईचा खराखुरा उद्रेक असेल? की हे नुसतेच अळवावरचे पाणी? मुळात ही चळवळ आहे का, क्रांती आहे का, हा प्रश्नच आधी विचारायला हवा. 'जेन झी'ची क्रांती आणि चळवळीची संकल्पना नक्की काय आहे? फॉलोअर वाढले म्हणून लोकशाहीव्यवस्थेतल्या मतदान प्रक्रियेवर याचा थेट परिणाम होईल, हे आताच म्हणणे घाईचे ठरेल.
समाजमाध्यमांवरचा आशय आणि लोकप्रियता पाहता, कॉक्रोच पार्टीच्या कल्पनेत मनोरंजनाचा आणि ट्रेन्डनुसार वाहण्याचा घटक अधिक वाटतो. ‘जेन झी’चा विकेंद्रित लक्ष घटकही विचारात घेतला पाहिजे. त्यामुळे अशा उपक्रमातले सातत्य किती टिकून राहील, याबद्दल शंका घेण्यास वाव शिल्लक राहतो. या साऱ्यांबद्दल बोलायला, त्याची उत्तरे शोधायला आजपासून सुरूवात केलीच पाहिजे; अन्यथा उशीर होईल, इतका इशारा ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने जरूर दिला आहे.
सरन्यायाधीशांच्या टिप्पणीमुळे तरुणांच्या अस्वस्थतेला वाचा फोडण्याचे काम अभिजितने अचूक केले, यात शंका नाही. अभिजितची मुलाखत गुरुवारच्या अंकात 'सकाळ'ने प्रसिद्ध केली होती आणि त्याच्या 'कॉक्रोच पार्टी'चे चित्र मांडण्याचा प्रयत्न केला होता. ‘कॉक्रोच पार्टी’ची स्थापना हा अपघात असून अवघ्या चार दिवसांत त्याच्या भवितव्याबद्दल काहीही सांगता येणार नाही. परंतु, ही बदलाची सुरवात आहे, याची खात्री आहे, असे अभिजितने म्हटले आहे. उपहास किंवा उपरोध प्रसंगी किती प्रभावी ठरू शकतो, याचे उदाहरण म्हणूनही या महाजाली घटनेकडे बघावे लागेल.
गेल्या बारा वर्षांतल्या कामगिरीचा डंका वाजवण्यात मोदी सरकार कुठेही कमी पडत नाही. काही मूलभूत स्वरुपाची कामे त्यांच्या सरकारने करून दाखवली, हेही नाकारण्यात अर्थ नाही. एकामागून एक निवडणुका जिंकण्याचे पराक्रम भाजपला दाखवता आले. त्यालाच जनतेची पोचपावती म्हणायचे. परंतु, समोर दिसणाऱ्या या मनोहर चित्राच्या मागे उदास वाटायला लावणारे बरेच काही धगधगते आहे, याचा स्वीकार सत्ताधाऱ्यांनी करायला हवा.
विशेषतः गेल्या काही महिन्यांतील राजकीय, आर्थिक घडामोडी, परदेशनीती आणि मोदी सरकारच्या धोरणांविषयीच्या नाराजीतले सातत्य यामुळेच ‘कॉक्रोच’सारख्या घटनांना इतका तीव्र प्रतिसाद मिळतो, असे मानायला जागा आहे. झुरळावरील विधान सरन्यायाधीशांनी केले. तरीही सत्ताधारी मोदींच्या विरोधात जेन झी असल्याचे चित्र निर्माण झाले. याचा अर्थ आपण एका अस्वस्थ कालखंडात आहोत.
अशा अस्वस्थ वर्तमानात कोणीही असे विधान केल्यास ते थेट सरकारवरील रोषामध्ये परिवर्तित होते. त्यामुळे, सरकारी धोरणांबद्दल तरुणाईतला एक मोठा घटक नाराज आहे, हे सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यावे. चार दिवसात ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे ‘एक्स’वरील तोंड बंद करण्यात आले. कारण या संकेतस्थळाची कोट्यानुकोटींची उड्डाणे सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला फेस आणणारी ठरली. समाजमाध्यमांवरील प्रसार आकड्यात मोजता येतो, ही यातली खरी मेख. भाजपलाही मागे टाकून चार दिवसात ही 'झुरळे' पुढे गेली, ही लक्षणीय बाब आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टी’ला मिळणारा पाठिंबा बघून सत्ताधाऱ्यांचे मीडिया सेलही तातडीने कामाला लागले, हे वेगळे सांगायला नको. या ‘कॉक्रोच’प्रमुखांचा बोलविता धनी कोण आहे? यांना पैसा कोण पुरवतो? पाकिस्तान्यांचाच भरणा पाठिराख्यांमध्ये सर्वाधिक कसा आहे, संबंधित अभिजित हा तरुण आम आदमी पक्षाचा पूर्णवेळ कार्यकर्ता कसा होता, याच्या सुरस कहाण्याही लोकांपर्यंत पोहोचत आहेत. विरोधी पक्षही या प्रकारात हात धुऊन घेत आहेत.
विरोधाला धार काढणे, हे विरोधकांचे कामच. ते त्यांनी करायला हवे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जेव्हा प्रखर आगपाखड होते, तेव्हा त्याला ''टूलकिट''चा भाग ठरवण्याचा प्रयत्न होतो, हे आपण रोहित वेमुला, किसान आंदोलन, जेएनयूतील आंदोलन, हाथरस बलात्कार प्रकरण, अखलाखची हत्या, अशा कितीतरी घटना-दुर्घटनांच्या वेळी पाहिले. विरोध समूळ उपटून काढण्यासाठी दरवेळी दंडुक्यांची गरज नसते. एखादा 'अदृश्य हात' उभा केला की काम भागते. पूर्वीही काँग्रेसच्या राजवटीत 'परकी हात' कुप्रसिद्ध होताच.
हे सत्ताधाऱ्यांचे व्यवच्छेदक लक्षण मानायला हवे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ तूर्त जमिनीवर कुठेही नाही. या पक्षाचे गावगन्ना पुढारी निर्माण होत आहेत, तेही स्वयंघोषितच. या पक्षाचा संस्थापक म्हणवणारा अभिजित हा स्वत:ही स्वयंघोषितच आहे. त्याचा पूर्वेतिहास 'आप', केजरीवाल, सिसोदिया यांच्याशी संबंधित असल्याने संशयाचे धुके निर्माण करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनाही कदाचित सोपे जाईल. शिवाय तो बोस्टनमध्ये बसून सत्ताधाऱ्यांना सरळ करण्याची भाषा करत आहे. भारतातील तरुणांमध्ये अस्वस्थता नक्कीच आहे; परंतु त्याचे भांडवल करता कामा नये. जर्मनीतला ध्रुव राठी, ऑस्ट्रेलियातला अर्पित शर्मा आणि बोस्टनचा अभिजित हे भाजपच्या विरोधाचा इंटरनेटच्या माध्यमातला चेहरा बनून तरुणांमध्ये अस्वस्थता आणि अराजक निर्माण करत असल्याचे आरोप एव्हाना सुरु झाले आहेत. या 'नॅरेटिव'च्या युद्धातून तावून सुलाखून बाहेर पडल्यानंतर ‘कॉक्रोच पार्टी’चे खरे स्वरूप दिसू लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.