रायपूर: छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यातील नारायणपूर गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. हंस वाहिनी विद्या मंदिर या खाजगी शाळेतील दोन महिला शिक्षिकांनी केवळ गृहपाठ पूर्ण न केल्याच्या कारणावरून चार वर्षांच्या बालकाला क्रूर आणि अमानुष शिक्षा दिल्याचा आरोप आहे. या शिक्षिकांनी मुलाचे कपडे उतरवून, त्याला दोरीने बांधून शाळेच्या आवारातील झाडावर लटकवले.
या घटनेचा व्हिडिओ जवळच्या छतावरून एका युवकाने रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली. व्हिडिओमध्ये मुलगा झाडाला असहाय्यपणे लटकलेला दिसतो, तर काजल साहू आणि अनुराधा देवांगन या दोन शिक्षिका त्याच्याजवळ उभ्या असल्याचे स्पष्ट दिसते. इंटरनेटवर व्हिडिओ समोर येताच अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि चौकशीला सुरुवात केली.
वृत्तानुसार, नर्सरी ते आठवीपर्यंत वर्ग चालवणाऱ्या या शाळेत सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू झाले. गृहपाठ तपासणीदरम्यान एका विद्यार्थ्याचे काम अपूर्ण असल्याचे पाहताच शिक्षिका काजल साहू यांनी रागाच्या भरात मुलाला वर्गाबाहेर काढून त्याला दोरीने झाडावर लटकवण्याची अमानवी शिक्षा दिली. मुलगा अनेक तास झाडाला लटकलेला होता. तो रडत होता, विनवण्या करत होता, पण शिक्षकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी शाळा व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला. मुलाचे नातेवाईक संतोष कुमार साहू यांनी शिक्षिकांवर गंभीर निष्काळजीपणा आणि क्रूरतेचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल ब्लॉक शिक्षण अधिकारी (बीईओ) डी.एस. लाक्रा यांनी घटनास्थळी पोहोचून तयार केला आणि तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा शिक्षण अधिकारी (डीईओ) अजय मिश्रा यांनीही घटना त्यांच्या निदर्शनास आल्याचे पुष्टी केली.
शिक्षण विभागाने क्लस्टर प्रभारी मनोज यादव यांना तातडीची चौकशी करण्यासाठी पाठवले. त्यांनी आरोपी शिक्षिकांची कृती "पूर्णपणे चुकीची" असल्याचे सांगत सविस्तर अहवाल उच्चाधिकाऱ्यांना सुपूर्द केला. शाळा प्रशासनानेही चूक मान्य केली असून त्यांनी सार्वजनिक माफी मागितली. आरोपी शिक्षिकांपैकी एकीने माध्यमांशी बोलताना "हो, माझ्याकडून चूक झाली... जाणूनबुजून केले नाही," असे विधान केले.
दरम्यान, मुलगा आता सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या घटनेनंतर पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. शाळेवर आणि संबंधित शिक्षिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. रामानुजनगर बीईओ आणि बीआरसी यांना संपूर्ण चौकशीचे आदेश देण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.