Chhattisgarh Train Accident: छत्तीसगढमधील बिलासपूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी (4 नोव्हेंबर) सायंकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. गेवरा रोडवरुन बिलासपूरकडे जाणाऱ्या मेमू लोकल ट्रेन (Train No. 68733) ची मालगाडीला धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. जयरामनगर स्टेशन आणि गतोरा स्टेशनच्या दरम्यान 'अप लाईन'वर (Up Line) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात घडल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्यसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. या भीषण अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, लोकल मेमू ट्रेन (68733) मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला. टक्कर इतकी जोरदार होती की, दोन्ही गाड्यांच्या काही डब्यांचे मोठे नुकसान झाले. धडकेमुळे गाडीचा वेग अचानक मंदावला तर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. आजूबाजूच्या गावातील लोक तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धावले. या अपघातात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे.
दुसरीकडे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनेनंतर लगेचच वैद्यकीय पथकांना पाचारण केले. सर्व मृत आणि जखमींना त्वरित रुग्णवाहिकेच्या माध्यमातून बिलासपूर येथील रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.
त्याचवेळी, अपघाताची (Accident) बातमी मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (GM) तरुण प्रकाश यांनी कोणतीही औपचारिकता न पाळता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत बिलासपूर मंडल रेल प्रबंधक राजमल खोइवाल हे देखील उपस्थित होते. या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः मदत कार्यावर बारकाईने निगरानी ठेवली. रेल्वेचे वैद्यकीय पथक, अग्निशमन दल आणि मोठा पोलीस फौजफाटा तातडीने घटनास्थळी पोहोचला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, "सर्व आवश्यक संसाधने घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत आणि जखमींवर त्वरित उपचार व्हावेत यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे." सध्या रुळावरील अडथळे दूर करुन रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
या अपघातामुळे इतर गाड्यांची (Trains) वाहतूक तात्पुरती प्रभावित झाली आहे, पण लवकरच ट्रॅक पूर्ववत केला जाईल. बिलासपूर जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफचे (NDRF) पथक देखील आवश्यकतेनुसार मदतीसाठी अलर्टवर ठेवण्यात आले आहे. स्थानिक रुग्णालयांमधील आपत्कालीन वॉर्ड सक्रिय करण्यात आले आहेत. SECR च्या प्रवक्त्याने सांगितले की, "अपघाताची माहिती मिळताच रेल्वेने तातडीने सर्व आवश्यक पाऊले उचलली. जखमींना प्राथमिक उपचार दिला जात असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या अपघाताच्या सखोल तपासाचे आदेश देण्यात आले आहेत." राज्य सरकारनेही या घटनेचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडून मागवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.