Digital India Cyber Fraud Warning: देशात डिजिटल सेवांचा वापर वेगाने वाढत असतानाच, सायबर गुन्हेगारांनी आता केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या डिजिटल सेवांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने डिजीलॉकर वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक इशारा जारी केला. सध्या इंटरनेटवर हुबेहूब डिजीलॉकरसारखी दिसणारी एक बनावट वेबसाईट सक्रिय असून, त्यावर युजर्सची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले.
'एक्स'वर 'डिजिटल इंडिया'ने (Digital India) याबाबत एक अधिकृत अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. या बनावट वेबसाईटच्या जाळ्यात अडकून जर कोणी आपले अकाऊंट तयार केले किंवा वैयक्तिक माहिती शेअर केली, तर त्याला मोठ्या आर्थिक आणि सायबर फसवणुकीचा सामना करावा लागू शकतो.
आजच्या काळात भारतातील कोट्यवधी नागरिक डिजीलॉकर या शासकीय ॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. यामध्ये नागरिक आपले महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित ठेवतात. मात्र, सध्या digilocker.cisceboard.org नावाची एक बनावट वेबसाईट इंटरनेटवर फिरत असून ती युजर्ससाठी मोठा धोका बनली.
डिजिटल इंडियाने (Digital India) स्पष्ट केले की, ही वेबसाईट पाहताना अगदी मूळ डिजीलॉकर पोर्टलसारखीच भासते; परंतु प्रत्यक्षात या वेबसाईटचा डिजीलॉकर, सीआयएससीई, नॅड, एनईजीडी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी (MeitY) कोणताही संबंध नाही. सायबर भामटे या बनावट पोर्टलच्या माध्यमातून लोकांची संवेदनशील माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत.
डिजिटल इंडियाच्या माहितीनुसार, या बनावट वेबसाईटवर युजर्सकडून प्रामुख्याने त्यांच्या गोपनीय गोष्टी मागवल्या जात आहेत. यामध्ये ओळख पडताळणीचे क्रमांक, ओटीपी (OTP), मोबाईल नंबर, मूळ कागदपत्रे आणि बँकेच्या व्यवहारांची माहिती भरण्यास सांगितले जात आहे. एकदा का ही अत्यंत खासगी माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागली, की ते युजर्सचे बँक खाते पूर्णपणे रिकामे करु शकतात. याशिवाय, आयडेंटिटी थेफ्ट (Identity Theft) म्हणजेच ओळख चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठीही या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे युजर्सनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर आपली खासगी माहिती शेअर करणे टाळावे.
या सायबर ठगांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डिजिटल इंडियाने काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या आहेत. बनावट वेबसाईट ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तिचा 'यूआरएल' (URL) म्हणजेच वेबसाईटचा पत्ता नीट तपासणे. जर युआरएल दिसायला अजब असेल किंवा अधिकृत शासकीय डोमेनसारखा नसेल, तर त्वरित सावध व्हावे. कोणत्याही अनोळखी लिंकवर थेट क्लिक करण्याऐवजी, नेहमी स्वतः ब्राऊझरमध्ये जाऊन अधिकृत वेबसाईटचा पत्ता टाईप करावा, जेणेकरुन खरी वेबसाईट समोर येईल. सायबर गुन्हेगारीच्या या काळात थोडीशी सतर्कता आणि योग्य माहितीच तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.