सुरक्षा दलात 'शिस्त' हा सर्वात महत्त्वाचा पैलू मानला जातो, मात्र बिहारच्या सहरसा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील बरियाहीस्थित होमगार्ड प्रशिक्षण संस्थेत महिला होमगार्डंनी चक्क गणवेशात भोजपुरी गाण्यांवर ठुमके धरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, यामुळे पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० जानेवारी २०२६ रोजी बरियाही येथील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात परेडचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्रात सध्या एकूण १८९ महिला होमगार्ड जवान प्रशिक्षण घेत आहेत.
परेडचा कार्यक्रम संपल्यानंतर किंवा त्यादरम्यान काही महिला जवानांनी चक्क वर्दीत असतानाच भोजपुरी गाण्यांवर डान्स करण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे उपस्थित असलेले इतर लोक या महिलांचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करत होते. वर्दीची मर्यादा विसरून केलेल्या या कृत्यामुळे आता या महिला होमगार्डच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
हा व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच विभागात मोठी खळबळ उडाली. सहरसा होमगार्डचे कमांडंट संदीप कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
"वर्दीत असताना असे वर्तन करणे हे विभागीय नियमांचे उल्लंघन आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात सहभागी असलेल्या महिला जवानांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा फटका केवळ महिला जवानांनाच नाही, तर त्यांच्या प्रशिक्षकांनाही बसला आहे. प्रशिक्षक नवीन कुमार आणि जय प्रकाश यादव यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
शिस्त लावण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत, या दोघांनाही भविष्यात कधीही 'ट्रेनर' म्हणून नियुक्त करू नये, अशी शिफारस विभागाने वरिष्ठ पातळीवर केली आहे. सध्या या महिला जवानांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, चौकशीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.