Rahul Gandhi Viral Video: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बिहारमधील 'मतदार हक्क यात्रे'दरम्यान मोठी सुरक्षा चूक समोर आली आहे. पूर्णिया ते अररिया दरम्यान झालेल्या बाईक रॅलीत राहुल गांधी स्वतः बाईक चालवत असताना ही घटना घडली. पूर्णियाच्या रस्त्यांवर राहुल गांधी बाईक चालवत असतानाच, एका लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीने गर्दीतून येऊन त्यांच्या गालाचे चुंबन घेतले. ही अचानक घडलेली घटना पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. एसपीजी (SPG) च्या जवानांनी तातडीने हस्तक्षेप करुन त्या व्यक्तीला राहुल गांधींपासून बाजूला केले आणि त्याला थप्पड मारुन हटवले. राहुल गांधींसोबत अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पूर्णियामध्ये राहुल गांधी यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. बाईकच्या पुढे आणि मागे हजारो लोक चालत होते. याच गर्दीचा फायदा घेत एक तरुण पुढे आला आणि त्याने राहुल गांधींना पकडून त्यांचे चुंबन घेतले. राहुल गांधीसुद्धा काही क्षणांसाठी अवाक झाले, पण त्यांनी कोणताही राग न दाखवता बाईक चालवणे सुरु ठेवले. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. यामुळे एका वरिष्ठ नेत्याच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राहुल गांधींनी रविवारी (24 ऑगस्ट) अररिया येथे इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहारमध्ये कोणत्याही परिस्थितीत मतांची चोरी होऊ देणार नाही, असा दावा केला. त्यांनी थेट निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले. राहुल म्हणाले, “निवडणूक आयोग भाजपचा (BJP) पार्टनर बनला आहे.”
राहुल गांधींनी पुढे म्हटले की, या यात्रेला मिळालेल्या यशावरुन हे सिद्ध होते की बिहारमधील करोडो लोक मतांच्या चोरीची बाब सत्य मानत आहेत. लोक स्वतःहून या यात्रेशी जोडले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाचे काम योग्य मतदार याद्या देणे आहे, परंतु त्यांनी हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हे काम केले नाही, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाचे वर्तन बिहारमध्येही (Bihar) मतांची चोरी करण्याचे आहे, मात्र आपण बिहारमध्ये मतांची चोरी होऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राहुल गांधींनी (Rahul Gandhi) निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप करताना कर्नाटकमधील एका घटनेचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघात मी मतदारांविषयी काही आकडेवारी दिली होती, त्यावेळी निवडणूक आयोगाने माझ्याकडे प्रतिज्ञापत्राची मागणी केली. मात्र, भाजपनेही अशीच आकडेवारी दिली असताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे प्रतिज्ञापत्राची मागणी केली नाही.” या घटनेवरुन निवडणूक आयोगाचा पक्षपात स्पष्ट होतो आणि प्रसारमाध्यमांनाही निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने उभा आहे हे माहीत आहे, असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधींची ‘मतदार हक्क यात्रा’ 17 ऑगस्ट रोजी बिहारच्या सासाराममधून सुरु झाली आहे. या यात्रेत इंडिया आघाडीमधील आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह सर्व घटक पक्षांचे नेते सहभागी आहेत. ही 16 दिवसांची यात्रा 20 जिल्ह्यांमधून जाणार असून, 1,300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करेल. 1 सप्टेंबर रोजी पाटणा येथे एका मोठ्या रॅलीने या यात्रेचा समारोप होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.