95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तारीख 22 एप्रिल रोजी उदगीर येथे सुरू होत आहे. या साहित्य संमेलनाला गोव्याचे कोकणी लेखक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले गेल्यामुळे गोव्यात (Goa) मोठा वाद निर्माण झाला आहे. या साहित्य संमेलनाला समांतर भरणारे 'विद्रोही मराठी साहित्य संमेलन' दिनांक 23 एप्रिल रोजी तिथल्याच 'महात्मा बसवण्णा वचनसाहित्य नगरी'त भरणार आहे. या विद्रोही साहित्य संमेलनात देखील गोव्यातून पत्रकार-लेखक प्रभाकर ढगे व कोकणी लेखक शैलेंद्र मेहता यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
एका कोकणी लेखकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे आल्यानंतर या निर्णयाविरुद्ध गोव्यातल्या काही संस्थांनी घेतलेल्या भूमिकेवर, 'विद्रोही मराठी साहित्य संमेलना'ची तसेच या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केल्या गेलेल्या साहित्यिकांची भूमिका काय आहे हे समजून घेणे नक्कीच उद्बोधक ठरेल. 'विद्रोही मराठी साहित्य संमेलना'च्या पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रकात त्यांची भूमिका स्पष्ट होते. ते म्हणतात, 'अखिल भारतीय मराठी संमेलन संयोजकांनी गोव्यातील दामोदर मावजो या कोंकणी साहित्यिकाला संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले म्हणून गोव्यातील मराठी साहित्यिकांनी उदगीरला येऊन मराठी साहित्य संमेलन उधळणार असल्याचे सांगितले. खरे तर मागील वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकही महाराष्ट्राबाहेरचा साहित्यिक नसल्याची टीका विद्रोही संस्कृती चळवळीने केली होती. त्या पार्श्वभूमीवर घाईघाईने दामोदर मावजो या कोकणी साहित्यिकाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे ठाले पाटील आणि कंपूने ठरवले. पण घाईत घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांना ज्या पद्धतीने अपमानित करून दिलेले निमंत्रण परत घेण्यात आले, त्याच 'निमंत्रण संस्कृती'चा पुन्हा वापर करण्याची संधी आता अखिल भारतीय संमेलनाचे संयोजक साधणार असल्याचे बोलले जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर 'सोळाव्या विद्रोही संमेलन, 'बहुभाषिकतेचा आदर, सांस्कृतिक बहुविधतेच्या सन्मान आणि संविधान समर्थन व सनातनवादाला विरोध या चतु:सूत्रीवर ठाम राहत, गोव्यातील साहित्यिक प्रभाकर ढगे व प्रख्यात कोकणी भाषिक साहित्यिक शैलेंद्र मेहता यांना उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याचा निर्णय जाहीर करते.'
या पत्रकात, गोव्यातील साहित्यिकांना किंवा उदगीरचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उधळण्याची भाषा करणाऱ्याना उद्देशून विद्रोही मराठी साहित्य संमेलन असेही आवाहन करते की, 'उदगीरचे ते अखिल भारतीय संमेलन उधळण्यापेक्षा, या साहित्यिकांनी समतेच्या महात्मा फुले यांच्या भूमिकेवर आधारित विद्रोही पर्याय बळकट करण्यासाठी उदगीरला यावे.'
गोव्यातून (Goa) विद्रोही साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जाणारे प्रभाकर ढगे या संबंधात आपला विचार मांडताना म्हणाले की महाराष्ट्र सोडल्यास इतर डझनभर राज्यांमध्ये मराठी आहे पण महाराष्ट्रातल्या कूपमंडूक वृत्तीच्या साहित्यिकांनी महाराष्ट्र सोडल्यास इतर राज्यांमधल्या मराठी भाषकांकडे व तिथल्या साहित्यिकांकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून बृहन्महाराष्ट्र मराठी माणसांवर सांस्कृतिक व सामाजिक पातळीवर कायम दुर्लक्ष कसे केले जाते याबद्दलची खंत प्रभाकर ढगे व्यक्त करत होते.
शैलेंद्र मेहता हे कोकणी लेखक व कवी. त्यांच्या दृष्टीने तर आज गोव्यात कोकणी-मराठीवाद हा अस्तित्वातच राहिलेला नाही. संघर्षाचा काळ ओलांडून कोकणी साहित्यिक आज साहित्यनिर्मितीत मग्न आहेत. कमी प्रमाणात का होईना पण कोकणीत दर्जेदार साहित्य निर्मिती होत आहे याकडे निर्देश करून ते म्हणाले की, बा. भ. बोरकर, लक्ष्मणराव सरदेसाई यासारख्या साहित्यिकांनी दोन्ही भाषेत साहित्यनिर्मिती केली. अलीकडच्या काळातही या दोन्ही भाषेत साहित्यनिर्मिती करणारे लेखक कवी आहेत. त्यामुळे संघर्षाचा काळ ओलांडून व कोकणी व मराठी असा भेद न करता पुढे जाणेच श्रेयस्कर ठरेल.
खरं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोकणी लेखक दामोदर मावजो यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण येते आणि त्याच वेळी समांतरपणे भरल्या जाणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनातही गोव्यातील लेखकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते ही गोमंतकीय साहित्य आणि साहित्यिकांसाठी लक्षणीय बाब आहे.
गोव्यातून विद्रोही साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जाणारे प्रभाकर ढगे यासंबंधात आपला विचार मांडताना म्हणाले की, महाराष्ट्र सोडल्यास इतर डझनभर राज्यांमध्ये मराठी आहे, पण महाराष्ट्रातल्या कूपमंडूक वृत्तीच्या साहित्यिकांनी महाराष्ट्र (Maharashtra) सोडल्यास इतर राज्यांमधल्या मराठीभाषकांकडे व तिथल्या साहित्यिकांकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून बृहन्महाराष्ट्र मराठी माणसांवर सांस्कृतिक व सामाजिक पातळीवर कायम दुर्लक्ष कसे केले जाते याबद्दलची खंत प्रभाकर ढगे व्यक्त करत होते.
शैलेंद्र मेहता हे कोकणी लेखक व कवी. त्यांच्या दृष्टीने तर आज गोव्यात कोकणी-मराठीवाद हा अस्तित्वातच राहिलेला नाही. संघर्षाचा काळ ओलांडून कोकणी साहित्यिक आज साहित्यनिर्मितीत मग्न आहेत. कमी प्रमाणात का होईना पण कोकणीत दर्जेदार साहित्य निर्मिती होत आहे याकडे निर्देश करून ते म्हणाले की, बा. भ. बोरकर, लक्ष्मणराव सरदेसाई यासारख्या साहित्यिकांनी दोन्ही भाषेत साहित्यनिर्मिती केली. अलीकडच्या काळातही या दोन्ही भाषेत साहित्यनिर्मिती करणारे लेखक कवी आहेत. त्यामुळे संघर्षाचा काळ ओलांडून व कोकणी व मराठी असा भेद न करता पुढे जाणेच श्रेयस्कर ठरेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.